1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात
Written By अभिनय कुलकर्णी|

युतीत बंडाचे वारे जोरात!

प्रदीप जैस्वाल महापौर विनायक पांडे
औरंगाबाद दि. २१ सप्टेंबर (हिं.स) - शिवसेना भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर होताच पक्षातल्या असंतुष्टांनीही बंडाचे निशाण फडकावले आहे. दोन्ही पक्षातील बंडोबांनी स्वतंत्र लढण्याची घोषणा केली असून शिवसेनेला मराठवाड्यात मोठ्या बंडखोरीला सामोरा जावे लागेल असे दिसते आहे. औरंगाबादचे माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांनी बंडखोरी करण्याचे संकेत दिले असून नाशिकचे शिवसेनेचे विद्यमान महापौर विनायक पांडे यांनी उमेदवारीसाठी मनसेची वाट धरली आहे.

औरंगाबाद शहरात सेनेचे परवापर्यंत जिल्हाप्रमुख असलेले प्रदीप जैस्वाल यांना उमेदवारी नाकारताच सेनेत पीए राज आले असल्याचा आरोप करीत सेना सोडली आणि निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. औरंगाबादचे सेनेचे उपमहापौर भाऊसाहेब वाघ यांनी भाजपचे माजी मंत्री हरिभाऊ बागडे यांच्या फुलंब्री या वॉर्डात अपक्ष लढण्याची तयारी जोरात चालविली आहे. कन्नड मतदारसंघात नामदेवराव पवार यांना उमेदवारी जाहीर झाल्याने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अण्णासाहेब शिंदे नाराज होवून बंडाच्या पवित्र्यात आहेत. जालना जिल्ह्यात परतूर मतदारसंघ भारतीय जनता पक्षाकडे आहे. विमान आ. बबनराव लोणीकर तेथे भाजपचे उमेदवार राहणार आहेत. मात्र शिवसेनेचे सुरेश जेथलिया तेथे बंडखोरी करून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. जालना शहरातही एका नगरसेवकाने सेना नेत्यांना शिवीगाळ केल्याने वातावरण तापले आहे.

उस्मानाबादमध्ये युतीत नाराजी
उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूरची जागा भारतीय जनता पक्षाला सुटल्याने शिवसैनिकात प्रचंड नाराजी आहे. गणेश सोनटक्के हे बंडाचा झेंडा उभारण्याच्या तयारीत आहेत. तसेच हिंगोली येथे भारतीय जनता पक्षाकडे जागा गेल्याने शिवसेनेने बंडाची भाषा सुरू केली आहे.

गोंदिया जिल्ह्यात भाजपाला बंडखोरीची लागण
विदर्भात गोंदिया विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला तर अर्जुनी मोर विधानसभा मतदारसंघात भाजपला बंडखोरीची लागण झाल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. अर्जुनी मोर विधानसभा मतदारसंघातून भाजपाने राजकुमार बडोले यांना उमेदवारी दिली आहे. शासकीय सेवेत अभियता म्हणून कार्यरत असलेले बडोले यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते व प्रबळ दावेदार लक्ष्मणराव चंद्रिकापुरे यांनी केली आहे. उमेदवारी रद्द न केल्यास बंडखोरी करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

नाशिकमध्ये सेनेचे महापौरच बंडखोर
नाशिकमध्ये विद्यमान महापौर विनायक पांडे यांना नाशिक पश्चिम या मतदारसंघातून उमेदवारी हवी होती. मात्र, जागावाटपात हा मतदारसंघ भाजपकडे गेल्याने पांडे यांचा हिरमोड झाला. आता त्यांनी उमेदवारीसाठी मनसेची वाट धरल्याचे समजते.

बीडमध्ये दगडफेक
बीड विधानसभा मतदारसंघातून विमान आ. सुनिल धांडे यांना उमेदवारी देत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांना पक्षाने विधानसभेचे तिकीट नाकारल्यामुळे नाराज झालेल्या संतप्त जगताप गटाच्या कार्यकर्त्यांनी बीडच्या अण्णाभाऊ साठे चौकात दगडफेक केली. या दगडफेकीत एका गाडीच्या काचा फुटल्या आहेत.

बीड विधानसभा मतदारसंघ हा युतीमध्ये शिवसेनेकडे आहे. गेल्या काही वर्षांपासून सेनेचे विमान आ. सुनील धांडे आणि जिल्हा प्रमुख अनिल जगताप असे दोन गट जिल्ह्यात निर्माण झाले आहेत.