परिपूर्ण साडी, बांधणीची साडी
'साडी' हा शब्द जरी उच्चारल्यानंतर साड्यांचे अनेक प्रकार डोळ्यासमोर उभे राहतात. भारदस्त व कला कौशल्यानी परिपूर्ण असलेल्या 'बांधणीची साडी'ने आजच्या आधुनिक फॅशनच्या युगात आपला ठसा उमटवला आहे.
बांधणीची साडी म्हणजे एकाच कापडावर रंगकाम करून त्या रंगाच्या अनेक रंगात स्वतंत्र रंगसंगती निर्माण करणारी साडी होय. साडी इतकी आकर्षक असते की, तिला पाहिल्यावर ती विकत घेण्याची लालसा महिलांमध्ये उत्पन्न झाल्याशिवाय राहत नाही. धावत्या युगात साडीची जागा स्कर्ट, मीडीने घेतली असली तरी पारंपरिक पद्धतीने तयार करण्यात आलेल्या साडीचे महत्त्व आजही कायम आहे. एवढेच नाही तर आजही हिंदी़, मराठी चित्रपटात व दूरदर्शनवरील मालिकेत या साड्यांना विशेष मागणी आहे. मात्र रेशीम धागा, रंग व त्याला लागणार्या वस्तुच्या दिवसेंदिवस किंमती वाढत असल्याने बांधणी साठी व्यवसायावर संक्रात आली आहे. त्यामुळे बांधणीच्या साडीची किंमत गगणाला भिडली आहे.
आधुनिक पद्धतीची बांधणी साडी आता विविध रंगात आणि डिझाईनमध्ये बाजारात अवतरली आहे. पूर्वी केवळ दोन रंग आणि कमळाचे फूल किंवा पदके यातूनच बांधणीची साडी तयार केली जात होती. लाल आणि काळ्या रंगातील बांधणीची साडी अनेकांना आकर्षित करत होती. विशेषत: बांधणीची साडी सर्वाधिक गुजरात आणि राजस्थानमध्ये अधिक लोकप्रिय आहे.
बांधणीच्या साडीत वापरण्यात येणारे रेशीम धागे आणि स्पॉट स्वरुपात केलेले धब्बे अत्यंत सुंदर दिसतात. विशेषत: हिंदू धर्मात आणि जैन धर्मात बांधणीची साडी विशिष्ट धार्मिक सोहळ्यामध्ये हमखास नेसण्याची प्रथा आहे.
बांधणीची साडी नऊ आणि सहा मीटरमध्ये उपलब्ध असते. पूर्वी केवळ कापसाच्या धाग्यापासून बांधणीची साडी तयार होत असे. आता रेशीम आणि कृत्रीम धागे वापरुन देखील साडी बांधणी स्वरुपात उपलब्ध असते, हे विशेष. साडीला रंगकाम करताना हलक्या रंगाबरोबरच गडद रंगाचे कॉम्बीनेशन, हे या साडीचे प्रमुख वैशिष्ट्य सांगता येईल.
कार्पोरेट क्षेत्रात मात्र बांधणीच्या साडीने अद्याप प्रवेश केला नसला तरी दूरदर्शनवरून दाखविल्या जाणार्या अनेक मालिकांमध्ये या साडीला मानाचे स्थान आहे. बांधणीच्या कापड्याचे ड्रेस आणि जिन्स वरील शॉर्ट टॉप यासाठी बांधणी मटेरियलला विशेष मागणी आहे. पारंपरिकता आणि आधूनिकतेची फॅशन म्हणूनच बांधणीकडे पाहिले जाते. महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये बांधणीच्या साड्यांची मोठी बाजारपेठ आहे.
(
महान्यूज)