मुळातच एड्स झालेल्या व्यक्तीकडे जेव्हा आपण पहातो तेव्हा नकळत आपल्या डोळयांवर एक नैतिकतेचा चष्मा चढत असतो. त्याचे कारणही तसेच आहे. हा आजार प्रामुख्याने लैंगिक मार्गातून पसरतो. यामुळे आपला आजार सर्वांपुढे येऊ नये असे एड्सच्या रूग्णालाही वाटत असते. समाजाचा दृष्टीकोन आणि रुग्णांची भीती यामुळे एड्स झाल्याचे निदान झाल्यावर सर्वात पहिली प्रतिक्रिया निराशेची, भीतीची आणि रोग लपवण्याची होते. डॉ. एडॉल्फ मेयर या मानसशास्त्रज्ञांचं एक वाक्य एड्सच्या आजाराचे अगदी चोख वर्णन करते. 'मानवी साद- प्रतिसादांच्या अनंत पैलूंनीच एखाद्या आजाराला आजारपण प्राप्त होत असते.'