पंडित जवाहरलाल नेहरू
|
हॅरो व केंब्रिज येथे शिक्षण घेतल्यानंतर १९१२ मध्ये नेहरूंनी बॅरिस्टर ही पदवी घेतली. पण भारतात परतल्यानंतर काय करायचे असा संभ्रम त्यांना पडला होता. त्यावेळी त्यांना गांधीजी भेटले. त्यांनी दिलेल्या गुरूमंत्राने नेहरूंच्या विचारांची दिशाच बदलली. वडिलांची चांगली चाललेली प्रॅक्टिस त्यांना वारसा म्हणून मिळत होती. मात्र, नेहरूंनी त्याकडे पाठ फिरवून स्वातंत्र्याच्या आंदोलनात उडी घेतली.
१९१२ मध्ये ते कॉंग्रेसशी जोडले गेले. १९२० मध्ये प्रतापगड येथे शेतकर्यांचा मोर्चा त्यांनी काढला. १९२८ मध्ये सायमन कमिशनविरोधात निदर्शने करताना ते जखमी झाले. १९३० मध्ये मीठाच्या सत्याग्रहात त्यांना अटक करण्यात आली. सहा महिने ते तुरूंगात होते. १९३५ मध्ये अल्मोडा तुरूंगात असताना त्यांनी आत्मचरित्र लिहिले. आयुष्यात एकूण नऊ वेळा ते तुरूंगात गेले.
|
पुढे स्वातंत्र्य आंदोलन यशस्वी ठरून देश स्वातंत्र्य होताच, पंतप्रधानपदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडली. २७ मे १९६४ मध्ये त्यांचे निधन होईपर्यंत ते त्या पदावर होते. लोकशाहीला मजबूत करणे, देश आणि घटनेतील धर्मनिरपेक्ष छबी प्रस्थापित करणे आणि भारताच्या विकासात दीर्घकालीन फायद्याच्या ठरतील अशा योजना राबविणे हे त्यांच्या कार्यकाळाचे वैशिष्ट्य म्हणता येईल.
|
स्वातंत्र्यानंतर त्यांचे व्यक्तिमत्व जगभरात झळाळून उठले. ते फक्त राष्ट्रीय नाही तर आंतरराष्ट्रीय नेता बनले. तटस्थ देशांची चळवळ त्यांच्याच नेतृत्वाखाली स्थापन झाली.
