1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी लेखक

कवी नामदेव ढसाळ यांचे निधन

WD
प्रख्यात कवी, विचारवंत व दलित पँथरचे संस्थापक पद्मश्री नामदेव ढसाळ यांचे 63 व्या वर्षी बुधवारी पहाटे चारच्या सुमारास बॉम्बे रूग्णालयात निधन झाले. मायस्थेनिया ग्रेव्हिस व कोलन कॅन्सर या आजाराचे त्रस्त असलेल्या ढसाळ यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून मुंबई स्थित बॉम्बे रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या निधनामुळे सामाजिक, साहित्यिक व राजकीय क्षेत्रातून तीव्र दु:ख व्यक्त होत आहे.

जीवनपरिचय
नामदेव ढसाळ यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९४९ रोजी पुणे जिल्ह्यातील एका खेडेगावात झाला. ढसाळांचे बालपण मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये गोलपीठा भागात अत्यंत गरीबीत गेले. त्यांनी स्वतः मुंबईमध्ये अनेक वर्षे टॅक्सी चालवली. ढसाळ यांनी १९७२ साली अमेरिकन ब्लॅक पँथर चळवळीच्या धरतीवर 'दलित पँथर' ही सशस्त्र संघटना सुरू केली. मराठी दलित साहित्यातील परिवर्तन घडवणारे लेखक आणि दलित चळवळीतील नेते म्हणून त्यांची ओळख होती. महानगरीय जीवन आणि बोली भाषा या विषयावरील मराठीतले महत्त्वाचे लेखन त्यांनी केले. १९७३ साली त्यांचा पहिला कवितासंग्रह 'गोलपीठा' प्रकाशित झाला. यानंतर आणखी कवितासंग्रह मूर्ख म्हाता-याने डोंगर हलवले (माओईस्ट विचारांवर आधारित), तुझी इयत्ता कंची?, खेळ (शृंगारिक), आणि प्रियदर्शीनी (इंदिरा गांधी यांच्या विषयीचा) प्रसिद्ध झाले. ढसाळ यांना २००४ साली 'साहित्य जीवन गौरव' पुरस्कार व 'पद्मश्री' पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा