बहिणी जिवाभावाच्या सख्या
- अरुणा सबाने
|
त्यांच्यात सतत भांडणे, अबोला, एकमेंकीबद्दलच्या तक्रारी, एकमेकींच्या चुका आईवडिलांना दाखवून देण्याची स्पर्धा सतत सुरू असते. बहुतांश कुटुंबात जिथे दोन बरोबरीच्या बहिणी आहेत तिथे हे सतत सुरू असते. जुळ्या बहिणी असल्यावर तर ही वादावादी अगदी विकोपाला जाऊन पोहचते. आश्चर्याची बाब मात्र अशी आहे की, या सगळ्या गोष्टी आईवडिलांच्या देखत घडत असूनही ते मात्र इकडे साफ दुर्लक्ष करतात. पण कधी कधी मात्र ही रोजची साध्या, साध्या भांडणाची बाब त्यातल्या एखाद्या बहिणीचे आयुष्य उद्धवस्त करायला निघते.
अंजू-मंजू या दोन जुळ्या बहिणी. अंजू दिसायला छान, बोलघेवडी, खेळण्यात हुशार, मंजू शांत, सालस आणि अबोल. पण दोघींच्या भांडणात प्रत्येकदा अंजूच बाजी मारून न्यायची. मंजूनी आईवडिलांकडे कधी तक्रार केलीच तर 'अग जाऊ दे,ती हट्टी आहे. तू शहाणी आहेस ना' म्हणून वेळ मारून न्यायचे आणि प्रत्येकदा अंजूचीच इच्छा पूर्ण व्हायची. मंजू मात्र दरवेळी मनातल्या मनात चिडून गप्प बसायची. कारण वडिलांचा पाठिंबा असलेली अंजू मंजूला काय देणार? प्रत्येक ठिकाणी चांगला वाटा हिसकावून घेण्याची अंजूला सवयच झाली. शेवटी गोष्ट इतकी पराकोटीला पोहचली की, तेव्हा आईवडिलांचे डोळे उघडूनही फादया नव्हता.
| |
एका परिवारातल्या दोन बहिणी जिवलग मैत्रिणीसारख्या न राहता एकदुसरीच्या प्रतिस्पर्धी असल्यासारख्या का वावरत असतील? एक बहीण दुसरीच्या खुशीची, तिच्या भावनांची कदर न करता चक्क दुसरीचा नवराच लाटते, शिवाय या कृत्याबद्दल तला अजिबात दु:ख वा खेद नसतो. ज्या दोन बहिणींनी स्नेह, प्रेम, आपुलकी आणि त्याग यांचा एकमेकींवर वर्षाव करायला पाहिजे त्या का आपलाच स्वार्थ बघण्यात धन्यता मानतात?
याची सुरुवात खरे म्हणजे अगदी लहानपणापासून होते. मोठी मुलगी जेव्हा तिचेच बालपण संपायचे असते त्यावेळी आपल्या जागेवर आपल्या आईच्या मांडीवर कुणी दसुरचं बाळ बघते, आई त्या बाळाचा खूप लाड करताना बघते, त्यावेळीच त्या बाळाबद्दल हिच्या मनात असूया निर्माण व्हायला लागते. खरं तर आईवडिलांनी तिच्या मनाची तयारी आधीपासून करायची असते. ''आपल्या घरी आता एक बाळ आपण तुझ्यासोबत खेळायला आणू'' वगैरे अशा भाषेत येणार्या बाळाबद्दल आपुलकी, स्नेह निर्माण करायचा असतो, परंतु अनेक पालक इथेच चुकतात. बाळाच्या संगोपनात व बाललीलात ते दोघेही इतके दंग होऊन जाता की, त्यांना ही सुद्धा लहान आहे याची आठवणच राहत नाही.
|
|
|
| |
दोन बहिणींचं हे नातच इतके प्रेमाचे, आपुलकीचे आणि जवळचे आहे की, यात एकमेकींबद्दल ईर्षा, द्वेष या गोष्टींना थाराच असायला नको. दोन बहिणींच्या विचारात, व्यवहारात, आवडी-निवडीत भिन्नता असणे नैसर्गिक आहे. परंतु प्रयत्न जर केला तर एकमेकींचे चांगले गुण घेणे फारसे कठीण नाही. दोघी आपापले स्वभाव, आवडीनिवडी बदलवून आपसात समानता निर्माण करू शकतात.
|
|
दोन्ही मुलांमध्ये सगळे गुण सारखेच सापडतील असे मुळीच नाही. कोणात कोणते तर कोणात कोणते. पण प्रत्येकात काही तरी विशेष गुण असतोच. त्या व्यक्तीचा तो विशेष गुण लक्षात घेऊन त्याचे कौतुक केलेच पाहिजे. तिच्यातला तो गुण वाढविण्यासाठी तिला प्रोत्साहित केलंच पाहिजे. उगाच एकीचेच कौतुक करून दुसरीला उणेदुणे करण्यात अर्थ नाही. आईवडिलांच्या उपेक्षेचा मुलांवर फार वाईट परिणाम होत असतो. म्हणून मुलांमध्ये पक्षपात व्हायलाच नको. आईवडिलांनी तो करायलाच नको. कुणी एकीची खूप तारीफ आणि कुणा एकीची खूप अवहेलना असे तर कधीच करू नये.
दोन बहिणींबध्ये जर भरपूर स्नेह, आपुलकी, आदर असेल तर त्या जीवनात एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होऊ शकतील. मोठमोठ्या समस्या एकमेकींच्या आधारानी सोडवू शकतील. अनेकदा आईवडिलांनंतर मुलीला माहेराला मुकावे लागते. कारण भावांनाही त्यांचे व्याप असतात (?) अशावेळी बहिणी बहिणीमध्ये खूप जवळीक असली तर आपापले माहेरपण सुद्धा एकमेकींकडे उपभोगू शकतात.
बहिणीबहिणींमध्ये जर मैत्रीपूर्ण वातावरण असले तर घरातले वातावरणही आनंदी, उत्साही राहते. संपूर्ण कुटुंबात सुख-समाधान फुलून राहते.
