1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. 20 children tragically die in school bus accident while returning from a trip

सहली वरून परत येताना स्कूल बसच्या अपघातात २० मुलांचा दुर्देवी मृत्यू

पूर्व युगांडातील सिपी फॉल्स येथे मुलांना घेऊन जाणारी शालेय बस उलटल्याने, २० निष्पाप मुलांसह एकूण २१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
आफ्रिकेतील युगांडा देशातून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. मुलांनी भरलेल्या एका स्कूल बसचा अपघात झाला असून, त्यात २० निष्पाप मुलांसह एकूण २१ जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुले शैक्षणिक सहलीवरून परत येत असताना हा अपघात घडला. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात पूर्व युगांडातील कपचोरवा जिल्ह्यात घडला, जिथे प्रसिद्ध सिपी धबधब्याजवळ बस रस्त्यावरून घसरून उलटली. यात एकवीस जणांचा मृत्यू झाला असून, अनेक मुले गंभीर जखमी झाली आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या बस अपघाताने युगांडाला धक्का बसला आहे. अनेक कुटुंबांनी आपली मुले कायमची गमावली आहेत. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात पूर्व युगांडातील कपचोरवा जिल्ह्यात गुरुवारी रात्री घडला. राजधानी कंपाला येथील स्कूलचे विद्यार्थी आणि शिक्षक प्रसिद्ध सिपी धबधब्याच्या शैक्षणिक सहलीवर गेले होते. परत येत असताना, बसवरील नियंत्रण अचानक सुटले, ती रस्त्यावरून बाजूला गेली, एका खडकाला धडकली आणि उलटली. अपघात इतका भीषण होता की बसच्या वरच्या भागाचे मोठे नुकसान झाले, असे पोलिसांनी सांगितले. 
 
पोलिसांनी सांगितले की, या अपघातात किमान २० मुले आणि एका प्रौढ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. युगांडाचे स्थानिक सरकार मंत्री, बलाम बारुगहारा अतीनी यांच्या म्हणण्यानुसार, मृत प्रौढ व्यक्ती शाळेचे संस्थापक आणि मुख्याध्यापक होते. अतीनी यांनी सांगितले की, इतर अनेक मुले गंभीर जखमी झाली असून, त्यापैकी नऊ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 
पोलिसांच्या माहितीनुसार , अपघातानंतर आजूबाजूच्या परिसरातील गावकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि नुकसान झालेल्या बसमधून मुलांना बाहेर काढून त्यांना विविध रुग्णालयांमध्ये पोहोचवण्यास मदत केली. गावकऱ्यांच्या तत्परतेमुळे अनेक मुलांना वेळेवर उपचार मिळाले.  प्राथमिक तपासानुसार, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले असावे, असा पोलिसांना संशय आहे. मात्र, त्यांनी अद्याप अपघाताचे कारण जाहीर केलेले नाही. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
Edited By - Priya Dixit