मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेद आता उघडपणे समोर आले आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या 'देवगिरी' या अधिकृत निवासस्थानी पार पडलेली वरिष्ठ नेत्यांची बैठक चांगलीच वादळी ठरली. आगामी पक्षीय नियोजनासाठी बोलावण्यात आलेल्या या बैठकीत तीव्र शाब्दिक चकमक, नेत्यांची अनुपस्थिती आणि अचानक झालेल्या एक्झिटमुळे पक्षांतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.
सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यात जोरदार वादावादी
बैठकीत प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांनी आपल्यावर आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यावर सातत्याने होणाऱ्या टीकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. "पक्षातील इतर कोणीही आमच्या बाजूने ठामपणे उभे राहत नाही, मग प्रत्येक वेळी टीकेचे धनी आम्हीच का व्हायचं?" असा संतप्त सवाल तटकरे यांनी उपस्थित केला. तसेच यावर वरिष्ठ नेतृत्व काय भूमिका घेणार, अशी विचारणाही त्यांनी केली.
सुनील तटकरे आपले मुद्दे मांडत असताना, राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांना मध्येच थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तटकरे यांनी नमते न घेता, "जोपर्यंत स्पष्टता येत नाही तोपर्यंत आपण बोलणारच," असे भुजबळांना ठणकावून सांगितले. यावरून दोघांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक उडाली.
प्रफुल्ल पटेलांची दांडी आणि पार्थ पवारांची अचानक एक्झिट
या बैठकीला आणखी एक मोठे वळण मिळाले जेव्हा ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल मुंबईत उपस्थित असूनही बैठकीला गैरहजर राहिले. त्यांच्या या अनुपस्थितीमुळे ते पक्षात नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
दुसरीकडे, अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सुनील तटकरे यांचे भाषण सुरू होण्यापूर्वीच पार्थ पवार देवगिरी बंगल्यावरील बैठकीतून अचानक बाहेर पडले. त्यांच्या या तडकाफडकी जाण्यामुळे पक्षात आणि पवार कुटुंबात सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चांना मोठी हवा मिळाली आहे.
पक्षाचा स्थापना मेळावा आणि अर्थखात्यावरून सुनेत्रा पवारांची खंत
येत्या १० जून रोजी होणारा पक्षाचा स्थापना मेळावा कुठे घ्यायचा, यावरूनही बैठकीत नेत्यांमध्ये मतमतांतरे पाहायला मिळाली. हा मेळावा मुंबईत घ्यायचा की पुण्यात, यावर एकमत होऊ शकले नाही.
याच बैठकीत सुनेत्रा पवार यांनीही महायुती सरकारमधील एका महत्त्वाच्या मुद्द्यावर आपली खंत व्यक्त केली. "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून आणि हा विषय वारंवार मांडूनही, अद्याप आपल्या पक्षाला अर्थ खाते पुन्हा देण्यात आलेले नाही," असे सुनेत्रा पवार यांनी बैठकीत बोलून दाखवले.
'डॅमेज कंट्रोल' आणि भुजबळांचे स्पष्टीकरण
पक्षाची बदनामी करणाऱ्यांना सडेतोड उत्तर द्या, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी नेत्यांना दिल्या. "आमचे २२ आमदार शरद पवारांच्या पक्षात जाणार अशा कंड्या पिकवून पक्षाची जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे, पक्ष पूर्णपणे एकसंध आहे," असा दावा त्यांनी केला. तसेच तटकरे आणि पटेल यांच्या पदांबाबत कोणताही संभ्रम नसून पक्षात ज्येष्ठ नेत्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल, अशी सारवासारव त्यांनी केली.
बैठक संपल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी मात्र वाद झाल्याचा इन्कार केला. "माझ्यात आणि सुनील तटकरेंमध्ये कोणताही वाद झालेला नाही, या केवळ अफवा आहेत आणि त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये," असे आवाहन भुजबळांनी केले. तरीही देवगिरी बंगल्यावर घडलेल्या या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस आता लपून राहिलेली नाही.