सोमवार, 16 फेब्रुवारी 2026
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. सचिन तेंडुलकर
Written By विकास शिरपूरकर|

अस्‍सा आहे आपला सचिन!

अस्सा सचिन
NDND
जिवंतपणी दंतकथा बनून राहणा-या काही व्‍यक्‍तींमध्‍ये सचिन रमेश तेंडुलकर हा 35 वर्षांचा तरुण आहे. गो-या सायबांचा खेळ म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या क्रिकेट या खेळावर गेल्‍या 16 वर्षांपासून अधिराज्‍य करीत आहे.

एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्‍माला आलेल्‍या सचिनने लहानपणापासूनच क्रिकेटमध्‍ये असलेल्‍या प्रचंड वेडापायी क्रिकेटलाच आपले करीअर करण्‍याचे ठरविले. त्‍याच्‍या वडीलांचे आवडते संगीत दिग्दर्शक सचिन देव बर्मन हे असल्‍याने त्‍यांच्‍या नावारूनच त्‍याचे नाव सचिन ठेवण्यात आले. शालेय काळात क्रिकेटचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर ह्यांच्याकडून त्‍याने क्रिकेटचे धडे घेतले.

मुलाचे पाय पाळण्‍यात दिसतात या उक्‍तीप्रमाणेच शालेय शिक्षण घेत असतानाच त्याने आपल्‍या खेळाने अनेकांना आश्‍चर्यचकित केले. 1988 मध्‍ये आपल्या पहिल्यावहिल्या प्रथम श्रेणी सामन्यामध्ये त्‍याला संधी मिळाली आणि त्‍याने तिचे सोने करीत शतक झळकाविले. त्यावेळी तो मुंबई संघाकडून गुजरातविरुद्ध खेळत होता.

1989 मध्‍ये पाकिस्‍तानविरुध्‍द आंतरराष्ट्रीय सामन्‍यात खेळलेल्‍या सचिनने या मालिकेत पाकच्‍याच भूमीवर पाकिस्‍तानच्‍या वासिम अक्रम, इम्रान खान, अब्दुल कादिर आणि वकार युनूस यांच्‍यासारख्या दिग्गज गोलंदाजांना हैराण करून सोडले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्‍ये सुरुवातीला निराशा हाती आलेल्‍या सचिनने आपल्‍या खेळाची खरी चुणूक दाखविली ती 1991-92 च्‍या ऑस्ट्रेलियन दौर्‍यात त्याने या मालिकेत सुंदर शतकी खेळी केली.

एकदिवसीय सामन्यांमधील पहिले शतकही त्‍याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच श्रीलंकेच्‍या भूमीवरच नोंदवले. 1997 साली विस्डेनने सचिनला त्या वर्षीचा सर्वोत्तम क्रिकेटपटू घोषित केले.

क्रिकेटच्‍या मैदानालाच आपले दुसरे घर मानणारा सचिन दोन वेळा भारतीय संघाचा कर्णधार राहिला आहे. मात्र कर्णधार पदावर राहताना कारकिर्दीकडे दुर्लक्ष होत असल्याचे लक्षात येताच त्‍याने ते पद सन्‍मानपूर्वक नाकारले.

क्रिकेटमधील अनेक रेकॉर्ड आपल्‍या नावे केलेल्‍या सचिनला अनेक भारतीय पुरस्‍कारांनीही गौरविण्‍यात आले आहे. क्रीडा रसिकांच्‍या मनावर अधिराज्‍य गाजविणा-या या खेळाडूच्‍या जीवनात अनेक संकटांनाही तोंड द्यावे लागले आहे. 90 ते 99 या धावसंख्‍येवर सर्वाधिक वेळा बाद होण्‍याचा विक्रमही सचिनच्‍याच नावावर आहे. मध्‍यंतरीच्‍या काळात दुखापतींनी त्रस्‍त झालेल्‍या आणि त्‍यामुळे फार्म हरवून बसलेल्‍या सचिनने निवृत्त व्‍हावे अशी टीकाही अनेकांनी केली होती. मात्र नेहमी आपल्‍या बॅटने टीकाकारांना उत्तर देणा-या सचिनने कसोटी क्रिकेटमध्‍ये सर्वाधिक धावांचा ब्रायन लाराचा विक्रम मोडीत काढून आपण खरोखरच 'ग्रेट' असल्‍याचे पुन्‍हा एकदा सिध्‍द केले आहे.