गनिमी कावा म्हणजे काय?
- श्रीधर रंगनाथ कुलकर्णी
|
| |
मराठ्यांच्या शत्रूंनी मराठ्यांच्या युद्धपद्धतीचा उल्लेख 'गनिमी कावा' या शब्दात केला आहे तो आत्मसमर्थनार्थ. मराठ्यांनी जिंकलेल्या सर्वच लढायांत आदिलशाही वा मोगल या दोन्ही शत्रूपक्षाचे सैन्यबळ तुलनेने अधिक होते. युद्धसामग्री आणि कोशबळ यांच्या बाबतीतही या दोन्ही सत्ता वरचढ होत्या. असे असताना त्यांचा पराभव युद्धात झाला याचे समर्थन कसे करणार? मराठ्यांच्या शत्रूंचे समर्थन असे की, 'आम्ही लढाई सहज जिंकली असती, परंतु गनीम (मराठे) काव्याने (कपटाने) लढले म्हणून ते विजयी झाले!'' 'गनिमी कावा' हा शब्दप्रयोग रूढ झाला तो असा. शत्रूने केलेली अवहेलना आपण मानाची बिरूदावली समजून स्वीकारली आहे. याचे कारण, मराठ्यांनी कालपरिस्थित्यनुरूप स्वत:चे असे युद्धतंत्र विकसित केले होते याची जाणीवच आपल्याला आहे असे दिसून येत नाही.
'धूर्तपणा', 'कपट', 'कावेबाजपणा' अशा प्रकारचे लाक्षणिक अर्थ 'कावा' या शब्दाला प्राप्त झालेले आहेत. कोणत्याही शब्दाला वाच्यार्थ असल्याविना त्याच्याभोवती लक्षणेने निर्माण झालेली अर्थवलये गोळा होत नसतात हे भाषाविज्ञानाचे तत्त्व आहे. त्याचप्रमाणे वाच्यार्थाची काही चिन्हे लक्षणेने येणार्या अर्थात कुठे तरी दडलेली असतात. या सिद्धांतास अनुसरून 'कावा' या शब्दास असलेला मूळ अर्थ लक्षात घेतला पाहिजे.
'महराष्ट्र शब्दकोशा'त कावा या शब्दाचे पाच अर्थ दिले आहेत. त्यंपैकी शेवटचे चार या शब्दाला लक्षणेने प्राप्त झालेले असून ते असे आहेत : 2. लुच्चेगिरी, 3. गुप्तकट, 4. हुलकावणी आणि 5. पीछेहाट. 'कावा' या शब्दाचा वाच्यार्थ प्रथम देण्यात आला आहे तो असा : घोड्याची रग जिरविण्यासाठी त्या घ्यावयास लावलेले फेरे, मंडले, घिरटी, फेर, घोडा भरधाव पळत असता त्याला वाटेल तसा वळविणे, फिरविणे, मंडळाकार आणणे, पुढे मागे भरधाव सोडणे'. 'गनिमी काव्या'च्या मूळ स्वरूपाचा शोध या वाच्यार्थास प्रमाण मानल्यानंतर कसा लागतो हे आता आपण पाहू.
|
|
|
(शिवकालीन राजनीती आणि रणनीती या पुस्तकातून साभार)
