शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

नऊ तासांपेक्षा जास्त झोप घातक

निरोगी राहण्यासाठी पुरेशी झोप गरजेची आहे. हे सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त म्हणजे नऊ तासांपेक्षा जास्त झोप घेत असाल तर तो तुमच्या हृदयाच्या आजारांचा संकेत असू शकतो आणि ते अकाली मृत्यूसाठी कारणीभूत ठरू शकते. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या शास्त्रज्ञांनी झोप आणि हृदयासंबंधी हालचालींवर केलेल्या 74 अध्ययनांच्या समीक्षेनंतर असा निष्कर्ष काढला आहे की, जे लोक दिवसातून दहा तास झोप घेतात, त्यांच्या अकाली मृत्यूची शक्यता आठ तास झोपणारांच्या तुलनेत 30 टक्क्यांनी वाढते. या अध्ययनांमध्ये 33 लाख लोकांच्या माहितीचा समावेश करण्यात आला होता. उशिरापर्यंत म्हणजे नऊ तासांपेक्षा जास्त झोपणार्‍या लोकांमध्ये कार्डियोवॅस्कुलर डिसिज म्हणजे ह्रदयासंबंधी आजार होण्याचा धोका 50 टक्के जास्त दिसून येतो. शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, सात तासांपेक्षा कमी झोपणार्‍या लोकांमध्ये अकाली मृत्यू वा हृदयाचा धोका आढळून आला नाही. मात्र गरजेपेक्षा जास्त झोप आरोग्यासाठी घातक का असते, हे अद्याप शास्त्रज्ञांच्या लक्षात आलेले नाही. मात्र कमी झोप व जास्त झोपेचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो, यावर ते सहमत आहेत.