गीता बासरा-भज्जी अडकणार विवाहबंधनात
नुकताच म्हणजे 2 जुलैला हरभजन सिंगनं आपला 35 वा वाढदिवस साजरा केला. आपल्या बर्थडे पार्टीमध्ये भज्जीनं वरातीत भांगडा करायला तयार राहा, असं म्हणत लवकरच आपण विवाहबंधनात अडकणार असल्याचे संकेत दिले.
अभिनेत्री गीता बासरासोबत भज्जीचे प्रेमसंबंध आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जालंधरच्या छोट्या बारादरी भागात आपली आई आणि मित्रांसोबत भज्जीनं वाढदिवस साजरा केला. विशेष म्हणजे भज्जीच्या वाढदिवशीच त्याची गर्लफ्रेड गीताचा चित्रपट ‘सेकंड हॅण्ड हजबंड’ रिलीज झालाय. यात हरभजनसुद्धा गेस्ट रोलमध्ये आहे. चित्रपटात हरभजन अशा तरुणाच्या भूमिकेत आहे ज्याचं लग्न गीता बासरा सोबत होतं.
सूत्रांनुसार या दोघांचं नातं खासगीतून सार्वजनिक होण्यासाठीच ही भूमिका भज्जीला देण्यात आलीय. गीतानं अजून सार्वजनिक ठिकाणी आपलं नातं स्वीकारलं नसलं तरी भज्जीचे सर्व मित्र तिला भाभीजी म्हणूनच हाक मारतात. भज्जीनं वाढदिवशी मित्रांना जे म्हटलं त्यानुसार आता लवकरच तो बोहल्यावर चढणार हे दिसतंय.