अगली आणि पगलीही
|
दिग्दर्शक : सचिन कमलाकर खोत
कथा-पटकथा : अनिल पांडे
गीतकार : अमिताभ वर्मा
संगीत : अनू मलिक
कलाकार : मल्लिका शेरावत, रणवीर शौरी, टीनू आनंद, सुष्मिता मुखर्जी, मनीष आनंद, विहंग नायक, भारती आचरेकर.
'अगली और पगली' या चित्रपटामागील दिग्दर्शक सचिन खोतचा विचार चांगला आहे. मात्र, पडद्यावर तो व्यवस्थितपणे मांडला गेलेला नाही.
कबीर उर्फ अगली (रणवीर शौरी) हा अभ्यासात 'ढ' असलेला मुलगा दहा वर्षांपासून इंजिनियरिंगच्या पाट्या टाकत बसला आहे. आपल्याला एखादी 'गर्लफ्रेंड' असावी ही त्याची मनीषा. कुहू उर्फ पगली (मल्लिका शेरावत) ही एक सुंदर मुलगी आहे. ती आधुनिक विचारसरणीची बिनधास्त मुलगी आहे. तिच्या तोंडापेक्षा जास्त तिचे हात चालतात. अगली व पगली यांच्या स्वभावात जमीन-आसमानचा फरक आहे.
|
चित्रपटाचे कथानक व पात्र निवड चांगली आहे. मात्र, दिग्दर्शक खोत यांनी पटकथा लेखक अनिल पांडे यांच्या कथेत काहीच बदल न करता त्यांनी वाढून ठेवलेल्या पत्रावळीवर कलाकारांना जेवायला बसविले आहे. कबीर व कुहू यांच्यात होणार्या वादविवादातच कथानक पुढे पुढे सरकत जाते. कबीर कुहूच्या प्रेमात पडतो. पण त्याला काही दाद देत नाही. त्याला ती खूप त्रास देते. त्याला अर्धनग्न अवस्थेत पळायला भाग पाडते. पेटीकोट घालून त्याला विनासीटची सायकल चालवायला लावते. एवढेच नव्हे तर हाय हिल्सचे शूज घालून चालायलाही लावते. या दोघांमधल्या गमती जमतीच्या क्षणांना चित्रपटात थोडीच जागा मिळाल्याने हसण्यासाठी फारसे प्रसंग सापडत नाहीत. कुहूची भूमिकाही नीट मांडलेली नाही.
कुहू आपल्या आधीच्या प्रियकाराला गमवून बसली आहे. त्याला विसरण्यासाठी ती कबीरशी मैत्री वाढविते. कबीरच्या सहवासात राहूनही ती तिच्या प्रियकराला विसरत नाही. मग ती एके दिवशी अचानक कबीरच्या जीवनातून बाहेर पडते. कबीर तिचा खूप शोध घेतो मात्र ती त्याला भेटत नाही. चित्रपटाचा शेवट गोड करण्यासाठी एकदम 'फिल्मी स्टाईल'ने त्या दोघांना भेटताना दाखविले आहे. चित्रपटाची कथा तशी छोटी आहे, तरी ही तिला रूपेरी पडद्यावर प्रस्तुत करण्यात सचिन खोतला अपयश आले आहे.
कबीरपासून दूर झाल्यानंतर कुहू दीड वर्षांकरता कोलकत्त्याला का जाते? कबीर तिचा शोध नीट का घेत नाही? तो तिला फोन, ई-मेल व एसएमएस न करता एका झाडावर तिच्यासाठी संदेश का चिटकवतो? चित्रपटात एका विशिष्ट झाडालाच लेखकाने का महत्व दिले आहे. संपूर्ण चित्रपटात त्या झाडाजवळ कबीर व कुहूला कधीच भेटताना दाखविले नाही? कबीर त्याचे घर व फोन नंबर का बदलतो? कुहूचे मत परिवर्तन होते? गौरव कपूरशी लग्न करायला कसा होकार देते ? गौरवला कबीरच्या विषयी सर्व माहिती कशी कळते? गौरवच्या माध्यमातून कबीर व कुहू का भेटत नाही ? असे एक ना अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडतात. पण चित्रपट संपेतोवर त्यांची उत्तरे मिळत नाहीत.
सचिन खोत यांचा हा पहिला चित्रपट आहे. पण दिग्दर्शक म्हणून त्यांचा प्रभाव जाणवत नाही. चित्रपटात कबीर व कुहू एक बिल्डिंगच्या छतावर भेटतात. ती बिल्डिंग कोठे आहे ? कोणाची आहे ? ते दोघे तेथेच का भेटतात? या बाबत चित्रपटात कुठेच उल्लेख केलेला आढळत नाही.
|
एकुणात काय 'अगली और पगली' पहायचा असल्यास अनु्त्तरीत प्रश्नांच्या मालिकेला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. शिवाय हा काय मुर्खपणा चाललाय म्हणून शिव्या घालू नका. कारण शीर्षकातच त्यांनी स्पष्ट केलंय, 'अगली और पगली'.
