एकदा तरी ''फूंक'' मारा
|
दिग्दर्शक : रामगोपाल वर्मा
संगीत : अमर मोहिले
कलाकार : सुदीप, अमृता खानविलकर, अहसास चन्ना, ज्योती सुभाष, अश्विनी काळसेकर.
श्रद्धा व अंधश्रद्धा यांच्यातील रेषा धूसर असते. त्यामुळेच श्रद्धा संपून अंधश्रद्धेचा किनारा कधी लागतो ते कळत नाही. साधी फुंकरही आपल्याला श्रद्धेतून अंधश्रद्धेकडे नेऊ शकते. 'फूंक' या रामगोपाल वर्माच्या चित्रपटाची मध्यवर्ती कल्पना हीच आहे.
काळी शक्ती अथवा जादूटोण्यावर विश्वास ठेवणारे लोकही समाजात असतात. तर पूर्णपणे विज्ञानवादीही या जगात आहेत. विज्ञानवादी लोकांच्या मते या जगात देवही नाही आणि भूतही. तर दैववादींच्या मते देव असेल तर मग दानवही असतीलच. त्यामुळे चांगल्याबरोबर वाईटही आहेच. अनेकदा विज्ञानवादी मंडळीही देवळात जातात. श्रद्धेचा छोटासा अंकूर कुठेतरी त्यांच्याही मनात असतो. पण सार्वजनिकरित्या ते आपण यातलं काहीही मानत नाहीत असंही सांगतात.
याच सगळ्या विषयांना 'फूंक' हाताळतो. 'फूंक' पाहिल्यावर हमखास 'टरकणार' अशी त्याची जाहिरात होत होती. पण 'फूंक' फारसा 'हॉरर' नाही. चित्रपट पाहताना जो कुणी घाबरेल त्याच्यासारखा भित्रा नाही, असेच म्हणावे लागेल. खरं पाहिले तर हा चित्रपट वास्तवाची जाणीव करून देणारा आहे. अनेकदा जीवनात काही अनाकलनीय घटना घडतात. त्या कशा घडतात? का घडतात? याचे उत्तर खुद्द संबंधीत व्यक्तीही देऊ शकत नाही.
|
राजीव त्याच्या मुलीला डॉक्टरांकडे घेऊन जातो. मात्र, त्याचा काही एक फायदा होत नाही. त्यामुळे राजीवला आपल्या मुलीसाठी जादूटोणा करणार्या मांत्रिकासमोर जावेच लागते. मांत्रिकाच्या दरबारात गेल्यानंतर राजीवच्या पत्नीचा परमेश्वरावरचा विश्वास उडून विज्ञानावर बसतो. त्याचवेळी राजीव अदृश्य शक्तींवर विश्वास ठेवायला लागतो. रामगोपाल वर्माने 'फूंक'च्या माध्यमातून मानवाच्या जीवनातील श्रद्धा व अंधश्रद्धा यांच्या अदृश्य घटनांवर प्रकाश टाकला आहे. चित्रपट कोठे संपवायचा याविषयी नक्कीच रामूला बराच विचार करावा लागला आहे. क्लायमॅक्स पाहून त्याचा अंदाज येतो. कुठल्या तरी एका बाजूने रामूने मत मांडणे अपेक्षित होते, मात्र श्रद्धा व अंधश्रद्धा यांच्यात समतोल राखण्याचा त्याने चांगला प्रयत्न केला आहे. चित्रपटाच्या शेवटी मात्र रामूचा कथानकावरील ताबा सुटल्याने का होईना, 'फूंक' जादूटोण्याकडे झुकताना दिसतो.
'फूंक'चा विषय चांगला आहे. अशा विषयावर चित्रपट काढण्याच्या रामूच्या हिमतीला दाद द्यावी लागेल. त्याची चित्रणाची शैलीच वेगळी आहे. साधी कथा त्याने 'फूंक' मारून गुंतागुंती केली आणि रुपेरी पडद्यावर प्रस्तुत केली आहे. प्रेक्षकांना घाबरवण्यासाठी रामूने स्पेशल इफेक्ट्स किंवा मेकअपची मदत घेतलेली नाही. प्रेक्षकांच्या मनात भीती निर्माण करण्याचे काम त्यांच्या कल्पनाशक्तीवर सोडले आहे. 'फूंक' लहान मुलाने पाहिला तरी त्याला घाबरण्यासारखे त्यात फारसे नाही.
|
एकुणात छानपैकी घाबरता येईल म्हणून 'फूंक' पहायला जाणार असाल तर निराशा होईल. पण श्रद्धा आणि अंधश्रद्धेकडे होणारी माणसाची ओढाताण यातून छान अनुभवता येईल. त्यासाठी तरी 'फुंक' पहा.
मी भूताला घाबरते- अमृता खानविलकर
