1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. चित्रपट समीक्षा

कमीने - पहायला हरकत नाही!

कमीने
बॅनर : यूटीवी मोशन पिक्चर्
निर्माता : रॉनी स्क्रूवाला
दिग्दर्शन व संगीत : विशाल भारद्वाज
गीत : गुलजार
कलाकार : शाहिद कपूर, प्रियंका चोप्रा, अमोल गुप्ते, देब मुखर्जी.

गुंडपटांची एक टिपीकल मांडणी ८० ते ९० च्या दशकात करण्यात आली होती. पण तेच कथानक घेऊन मकबूल व ओंकारा असे सकस चित्रपट देणार्‍या विशाल भारद्वाजने कमीने वेगळ्या पद्धतीने मांडला आहे. एकदा पहायला हरकत नाही.

कमीनेमध्ये ते सैफ अली खानला घेण्यास उत्सुक होता. पण सैफ 'लव्ह आज कल' मध्ये गुंतला होता. शिवाय सैफचे वय 'कमीने'तील भूमिकेपेक्षा बरेच जास्त वाटत होते. त्यामुळे शाहिदला घ्यायचे ठरले. शाहिदच्या आयुष्यातली ही वेगळी फिल्म आहे. शिवाय तो यात डबल रोलमध्ये आहे.

कथानक असे- चार्ली ( शाहिद कपूर) व गुड्डू (शाहिद कपूर) भाई आहे. चार्लीला श्रीमंत व्हायचेय. तेही झटपट. त्यासाठी काहीही करायची त्याची तयारी आहे. त्यासाठी तो गुंड बनायलाही मागेपुढे बघत नाही.

गुड्डू एका एनजीओ फर्ममध्ये ट्रेनी आहे. तो प्रामाणिक आणि कष्टाळू आहे. स्वीटी (प्रियंका चोप्रा) त्याची प्रेयसी आहे. स्वीटीचा भाऊ भोपे (अमोल गुप्ते) गॅंगस्टर आहे. महाराष्ट्रात आलेल्या परप्रांतीयांना हाकलण्याचा वसा त्याने घेतला आहे.

चार्ली व गुड्डू जुळे भाऊ असूनही एकमेकांपेक्षा अगदी वेगळे आहेत. चार्ली चाचरत बोलतो तर गुड्डू तोतरे. परस्परांना ते पहातही नाहीत. पण एका पावसाळी रात्री दोघांची आयुष्ये एकमेकांत मिसळतात. यातच मग अनेक समज गैरसमज होतात. बंदुका, ड्रग्ज, पैशाच्या दुनियेत दोघेही हरवून जातात. गॅंगस्टर्स, भ्रष्ट राजकीय नेते, बंडखोर, भ्रष्ट पोलिस यांच्याशी त्यांची गाठ पडते. त्यासाठी दोघेही एकत्र येऊन लढा देतात.

कथेचा विचार करायचा झाल्यास ती वेगळी नाही. पण त्याचे सादरीकरण नक्कीच वेगळे आहे. प्रेक्षकांना फार विचार करायची संधी न देता चित्रपट पुढे सरकतो पटकथा बारकाईने लिहीली गेली आहे. ती तितक्याच बारकाईने आणि वेगवान पद्धतीने विशालने मांडली आहे. पण इतर चित्रपटांसारखा हा चित्रपट डोके बाजूला ठेवून पहाता येणार नाही. संवाद नीट ऐकले नाहीत तर कदाचित पुढच्या कृतीचा अर्थही लागणार नाही. त्यामुळे पूर्ण चित्रपट लक्ष देऊनच पहायला लागतो.

चित्रपटातले वातावरण छान टिपले आहे. वस्तुस्थितीचा भास नक्कीच होतो. अभिनयाच्या बाबतीत शाहिद कपूर कमी पडलाय. त्याच्याऐवजी दुसरा कोणी चांगला अभिनेता असता तर मजा आली असती. प्रियंका चोप्राने महाराष्ट्रीयन मुलीची भूमिका छान केली आहे. शाहिदपेक्षा ती वरचढ ठरली आहे. बाकी कलावंतही आपल्या जागी फिट.

हा दिग्दर्शक विशाल भारद्वाजचा सिनेमा आहे याची जाणीव क्षणोक्षणी होते. त्यामुळे त्याचे चित्रपट आवडणार्‍यांनाही हाही नक्की आवडेल.
About Writer
अभिनय कुलकर्णी