- मनोरंजन
» - बॉलीवूड
» - चित्रपट समीक्षा
ढोलः अपेक्षा फोल
निर्माता: परसेप्ट पिक्चर कंपनीदिग्दर्शक: प्रियदर्शनसंगीतकार: प्रीतम चक्रवर्तीकलाकार: तुषार कपूर, तनुश्री दत्ता, शर्मन जोशी, कुणाला खेमू, राजपाल यादव, ओमपुरी, पायल रोहतगी, अरबाज खान, असरानीरेटिंग: 2/5 चांगले चित्रपट देण्यासाठी प्रियदर्शनची ख्याती आहे. पण आता त्यालाही रामगोपाल वर्माची लागण झालीय बहुतेक. रामूच्या फॅक्टरीतून जसे चित्रपट एकामागोमाग एक चित्रपट येतात. तसे आता प्रियदर्शनचे झालेय. विशेष म्हणजे रामू आणि प्रियदर्शनच्या फॅक्टरीतील चित्रपट उत्पादनाची गुणवत्ताही सारखीच होऊ लागली आहे. हेराफेरीसारखा नितांतसुंदर विनोदी चित्रपट देणारा तो हाच का प्रियदर्शन असा प्रश्न पडावा असे त्याचे चित्रपट आहेत.हल्ली बॉलिवूडमध्ये एक नवी फॅशन रूढ झाली आहे. चित्रपट य़शस्वी करायचा तर तो विनोदी हवा. शिवाय एका विनोदी अभिनेत्याच्या जोरावर आता चित्रपट चालत नाही. म्हणून बऱ्यापैकी विनोदाचा सेन्स असलेल्या दोन चार अभिनेत्यांना घ्यायचे आणि चित्रपट काढायाचा, असा नवा फंडा सुरू झालाय. उदा. मस्ती, धमाल, आणि गोलमाल. प्रियदर्शनला आता या फंडाचीही लागण झालीय. त्याचा 'ढोल' हा चित्रपट याच पठडीतील आहे. झटपट श्रीमंत होण्यासाठी श्रीमंत बापाच्या मुलीला पटविणारे चार तरूण आणि त्यांचे उद्योग या परंपरागत एक ओळीच्या कथानकाला प्रियदर्शनने गुन्हेगारीचे ठिगळ चिकटवले आहे. चित्रपटात बाकी काहीही नाही.
शर्मन जोशी (याला विनोदाचा सेन्स चांगला आहे), तुषार कपूर, कुणाल खेमू हे फ्लॉप नायक आहेत. त्यांच्या जोडीला राजपाल यादव आहे. राजपालने अभिनय चांगला केला आहे. पण या बाकीच्यांमध्ये तो गरीब बापडा वाटतो. त्याने तनुश्री दत्ताला पटविण्यासाठी केलेला उद्योग बालिश वाटतो. प्रियदर्शनच्या चित्रपटात प्रासंगिक विनोदावर भर असतो. 'ढोल' मध्ये संवादाच्या भर दिलाय. त्यामुळे जास्तीत जास्त अर्धा तास प्रेक्षक हसतात. नंतर हसविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे जाणवते. हसण्यासारखी परिस्थितीच नसेल तर संवादाला काहीच महत्त्व राहत नाही.चित्रपटाच्या मध्यंतरापर्यंत कथानक पुढे जातच नाही. कसातरी अडीच तासाचा चित्रपट पूर्ण केलेला दिसतो. अर्थहीन दृश्ये आणि नीरस संवाद प्रेक्षकांच्या सहनशक्तीचा अंत पाहतात. प्रियदर्शनच्या चित्रपटाचा शेवट नेहमी सर्वजण एकत्र येऊन धावपळ किंवा मारामारी करतात. 'ढोल' मध्येही तसेच आहे.
राजपाल यादवचा अभिनय सर्वांत चांगला आहे. शर्मन जोशीचा चांगला उपयोग करून घेता आला नाही. कुणाल खेमूत आत्मविश्वासाची उणीव जाणवते. तुषार कपूर पडद्यावर दिसतो. (म्हणजे अभिनय करतो असे नाही.) चित्रपटात एकच अभिनेत्री असली तरी (तनुश्री दत्ता) तिला फारसा वाव नाही. ज्या भूमिकेला महत्त्व, अर्थ नाही अशा प्रकारच्या भूमिका ओमपुरी का करतात ते समजत नाहीत. असरानी आणि अरबाज यांनी रिकाम्या जागा भरल्या आहेत.'ढोल' एकच गाणं लक्षात राहण्यासारखे आहे. बाकीची सर्व गाणी विसरून जाण्यासारखी आहेत. संवाद द्विअर्थी नाहीत हे नशीब. अधिकाधिक संपादन करून चित्रपट अर्ध्या तासाने कमी केला पाहिजे. तनुश्री आणि पायलला बासरीने शोधण्याचे दृश्य सर्वांत मोठे आहे. या चित्रपटाच्या निर्मितीवरून असे वाटते की प्रियदर्शनने आता आपल्याकडे विषय नसल्यास शांत बसावे उगाचच काहीतरी 'हेराफेरी' करून प्रेक्षकाच्या गळी मारण्याचा प्रयत्न करू नये.