''देव डी''- इमोशनल अत्याचार
|
दिग्दर्शक - अनुराग कश्यप
संगीत - अमित त्रिवेदी
कलाकार - अभय देवल, कल्कि कोएच्लिन, माही गिल, परख मदान
म्हातारीला पावडर लावून तरूणी करण्याची आजकाल फॅशनच झाली आहे. बॉलीवूड तरी त्याला कसा अपवाद असेल. नवीन ताकदीचे लेखकच नसल्याने चित्रपटांमध्येही तोच-तोच पणा येत आहे. जुन्या चित्रपटांचे रिमेक त्या चित्रपटांइतके दर्जेदार तर राहू देच पण, त्याच्या आसपास फिरकण्याच्या पात्रतेचेही होत नाहीयेत. आता देवदासचे उदाहरण घ्या. पारो पारो करत रडणा-या शाहरूखची ओव्हर एक्टींग बघून प्रेक्षकांना शाहरूखची दया आली होती. पण, किमान या चित्रपटाने मुळ 'देवदास' ला फारसा धक्का लागू दिला नव्हता. आता गवगवा करत दाखल झालेल्या 'देव-डी' मध्ये देवदासची पार वाट लावून टाकली आहे.
|
देव घरी परततो तेव्हा त्याच्याबरोबर सेक्स करण्यासाठी पारो गादी घेऊन शेतात गेल्याचे दाखविण्यात आले आहे. सेक्ससाठी स्त्री पुढाकार घेते, असे दृश्य यापूर्वी कमी चित्रपटांमध्ये दिसते. त्यामुळे काहींच्या मते हा चित्रपट भारतीय परंपरेला छेद देणारा ठरेल.
|
शरतचंद्र यांच्या 'देवदास' या कादंबरीचे नेमके चित्रण आपल्या चित्रपटात व्हावे, असा यापूर्वीच्या निर्माता-दिग्दर्शकांचा प्रयत्न होता. पण, अनुराग यांनी त्याचे तीन-तेरा वाजवलेले दिसतात. त्याने काही चांगली दृश्ये घेतली पण, मुळ आशयालाच धक्का लावल्यावर बाकीचे चांगले असून काहीच उपयोग नाही. त्यांनी आपल्या चित्रपटाचे नाव देवदासशी जोडले आणि मुळ कथानकाची चिरफाड करूनही केवळ सेक्सवर भर दिला आहे.
अभय देवलचा अभिनय चांगला आहे पण, या भूमिकेसाठी त्याला काही दिवस खरोखरीच सिगारेट आणि दारू प्यावी लागली. पारोच्या रूपात माही गिलचा प्रयत्न उत्तम आहे. इतकी बोल्ड भूमिका तिने तेवढ्याच आत्मविश्वासाने केली आहे. कल्कि कोएच्लिन मात्र काहीशी कमी पडली. विशेष म्हणजे यामध्ये एक डझनहून अधिक गाणी भरण्यात आली आहेत. काही अगदीच टाकाऊ असली तरी 'इमोशनल अत्याचार','साली खुशी' आणि 'नयन तरसे' सारखी गीते ऐकण्यासारखी आहेत.
चित्रपटाची जाहिरात करताना इमोशनल अत्याचार अशी पंचलाईन आहे. ती किती खरी आहे हे चित्रपट पाहिल्यावर कळून येते. चित्रपट आपल्या इमोशन्सला झेपत नाही आणि अत्याचार झाल्याची भावना झाल्यास नवलही नाही.
