शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. चित्रपट समीक्षा
Written By
Last Modified: रविवार, 2 नोव्हेंबर 2014 (21:55 IST)

सुपर नानी : चित्रपट परीक्षण

दिल, बेटा, राजा, इश्क, ग्रँड मस्ती असे सुपरहिट चित्रपट देणार्‍या इंदरकुमार यांनी रेखा या अभिनेत्रीला घेऊन तयार केलेला ‘सुपर नानी’पडद्यावर झळकला. एकहाती चित्रपट खुलवण्याची व तो हिट करण्याची क्षमता असणार्‍या मोजक्या अभिनेत्रींमध्ये रेखाचा क्रमांक अव्वल आहे. खूबसुरत, खून भरी माँग, संसार, फूल बने अंगारे आदी चित्रपटांतून तिने हे सिध्द केले आहे. एकतर दिग्दर्शक इंदरकुमार व लेखक विपुल मेहता यांनी ‘खून भरी माँग’ पाहिला नसावा किंवा रेखाने ही स्क्रीप्ट वाचली नसावी अशी शंका येते. कारण ‘सुपर नानी’ही ‘खून भरी माँग’ची पुढची आवृत्ती असावी इतपत यात साम्य आहे. असो, रांधा, वाढा व उष्टी काढा यात अडकलेली माता असो किंवा पत्नी, स्त्रीच्या वाटय़ाला येणारे कष्ट किंवा कुटुंबीयांसाठी तिने केलेला त्याग याकडे कानाडोळा करणार्‍यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन टाकणारी ही ‘सुपर नानी’ची थीम योग्य पटकथेअभावी काहीशी वाया गेली आहे. रेखाची आजीबाई जोरात. पण पटकथा कोमात अशी काहीशी स्थिती ‘सुपर नानी’ची झाली आहे. भारती भाटिया (रेखा) एक कर्तव्यदक्ष गृहिणी आहे. पती आर.के. भाटिया (रणधीर कपूर) हे बडय़ा कंपनीचे सीईओ, मुलगा शेअर मार्केटमध्ये व्यवहार करणारा, मुलगी लिव्ह इन रिलेशनचे ङ्खॅड डोक्यात घेतलेली, तर सुनेच्या डोक्यात नटी होण्याची हवा असे भारतीचे कुटुंब. तिची एक मुलगी अमेरिकेत आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला हवे नको ते पाहण्यात व त्यात चुका झाल्यास त्यांचे टोमणे, बोलणे खाणे असा भारतीचा दिनक्रम.

तिचा अमेरिकेतील नातू मन (शर्मन जोशी) त्यांच्याकडे येतो आणि आपल्याला आजीची अवस्था पाहतो. भारतीचा पाणउतारा होणारे काही प्रसंग मनला रुचत नाहीत. मग मन आपल्या आजीचा मेकओव्हर घटवून आणतो. मग ही सुपर नानी सुपर मॉडेल बनते व घरातल्या सदस्यांना चांगल्या वळणावर आणते. सुपर नानीची पटकथा, संवाद विपुल मेहरा यांनी लिहले आहेत. संवाद खटकेबाज आहेत. मात्र पटकथेची मांडणी जुन्या बाटलीत जुनी दारू या प्रमाणे झाली आहे. त्यात नावीन्य नाही. नव्या घटना नाहीत. पुढे काय होणार हे पहिल्या 10 मिनिटांतच लक्षात आल्याने रसभंग होतो. निदान प्रसंगांच्या मांडणीत तरी वैविध्य आणायला हवे होते. रेखा सारखे खणखणीत नाणे साथीला असताना त्याचा वापर तेच ते करण्यासाठी केला आहे. संजीव -दर्शन व हर्षीत सक्सेना यांच्या संगीताने सजलेली प्रभू मेरे घर को, मेहेरु- मेहेरू, धानी चुनरिया, नानी माँ अशी गाणी बर्‍यापैकी जमली आहेत. आजीचा मेकओव्हर करणारा नातू शर्मन जोशीने चांगला रंगवला आहे.