1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
  6. भाऊबंदकीचे दिवस

भाऊबंदकीचे दिवस

महाराष्ट्रातील राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या शिवसेना आणि मनसे या दोन राजकीय पक्षातील मतभेदांना आता हिंसक वळण मिळत आहे. मागील काही दिवसांपासून उद्धव आणि राज यांच्यातील वाद उफाळून आले आहेत. त्याला महायुतीत मनसेला स्थान न मिळाल्याचा तसेच लोकसभा निवडणुकीत सेना उमेदवारांपुढे आव्हान म्हणून उभे असणार्‍या मनसे उमेदवारांचाही संदर्भ आहे. मराठी मतदारांची मक्तेदारी आपलीच असल्याचा समज असलेल्या या दोन्ही पक्षामध्ये आता शिवसेनाप्रमुखांचा खरा राजकीय वारसदार कोण? या जुन्या मुद्याला नव्याने तोंड फुटले आहे. एकीकडे जयदेव ठाकरे संपत्तीचा वाद न्यायालयात घेऊन गेले असताना, बाळासाहेबांच्या राजकीय वारशावरूनही दोन पक्षात म्हणजेच त्यांच्या प्रमुखात आणि कार्यकर्यांत कलगीतुरा आणि लठ्ठालठ्ठीची वेळ यावी, हे काही महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पर्यावरणासाठी पोषक ठरणारी बाब म्हणता येणार नाही. 

इथे मर्‍हाटी मुलुखात दोन भावांमध्ये राजकीय साठमारी सुरू असतानाच दिल्लीच्या जामा मशिदीचे इमाम आणि त्यांच्या बंधूंमध्येही काँग्रेसपक्षाला लोकसभा निवडणुकीत पाठिंबाचा फतवा जारी करण्यावरून वाद उफाळून आले आहेत. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया  गांधी आणि जामा मशिदचे इमाम सय्यद अहमद बुखारी यांच्या भेटीवर टीकेची झोड उठविली आहे. इमामांचे धाकटे बंधू सय्यद याह्या बुखारी यांनी काँग्रेस पक्षाध्क्षांच्या घरी जाऊन भेटाची इमामांना काय गरज होती? असा सवाल केला आहे. इमामांच्या भाऊबंदकीनेही देशातील मुस्लीम समाजात संभ्रम निर्माण होऊ पाहात आहे. देशाची राज्यघटना जरी धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करत असली तरी भारतामध्ये धर्म ही बाब मते मागण्याचे आणि निवडून येण्याचे साधन ठरत आली आहे. आजही त्यात मुळीच बदल होताना, घडताना दिसत नाही, ही भारतीय जनतेची आणि आपल्या लोकशाहीचीच शोकांतिका म्हटली पाहिजे.

मराठी मुलुखाला भाऊबंदकीचा शाप असल्याचा शिवपूर्वकाळापासूनचा इतिहास आहे. ठाकरे बंधूंमधील उफाळलेला वाद आता शिवसैनिक आणि मनसैनिकांसाठी मुंबईत राडेबाजीला कारण ठरताना दिसतोय. गेल्या काही दिवसांपासून मराठी संस्कृतीचा अभिमान नव्हे तर गर्व बाळगणार्‍यांकडून औकात, खंजीर अशा ऐतिहासिक कादंबर्‍यात शोभणार्‍या शब्दांचा स्वैरपणे वापर घडत आहे. मनसे म्हणजे काँग्रेसने रचलेला राजकीय सापळा असल्याची उद्धव यांची कडवट टीका राज यांना न झोंबती तरच नवल ! त्यात पुन्हा शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचा मुद्दाही आता राजकीय बनू पाहात आहे. तिकडे तमिळनाडू राज्यातही तमिळ अस्मितेचे राजकारण करणार्‍या ‘द्रविड मुन्नेत्र कळघम’ या एम. करुणानिधी यांच्या पक्षातही भाऊबंदकीला तोंड फुटले आहे. राजकारण आणि सत्ताकारण ही अशी क्षेत्रे आहेत की, तिथे कुणाच महत्त्वाकांक्षा कधी टोकदार होतील याचा नेम नाही. मग तो वाद ठाकरे बंधूंसारख्या एका घराणतला असो किंवा करुणानिधी पुत्रांमधील असो अथवा धार्मिक राजकारणात मुरलेल्या जामा मशिदीच्या इमाम बंधूंतील असो. लोकसभा निवडणुकीच्या वातावरणात देशात मात्र राजकीय भाऊबंदकीचे दिवस पुन्हा उफाळून आले आहेत.