तुकाराम महाराज पालखी सोहळचे आज प्रस्थान
आषाढी एकादशीसाठी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे बुधवारी श्री क्षेत्र देहू येथून प्रस्थान होणार आहे. तर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे गुरुवारी प्रस्थान होणार आहे. प्रस्थान सोहळ्याची बहुतांशी तयारी पूर्ण झाली असून राज्याच्या विविध भागातून वैष्णव देहू आणि आळंदीत दाखल झाले आहेत.
श्री क्षेत्र देहू येथील इंद्रायणी नदीचा परिसर वारकरी तसेच भाविक यांनी व्यापून गेला आहे. भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन असंख्य भाविक हरिनामाच्या जयघोषात आणि टाळ मृदंगाच्या गजरात दंग झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्याचबरोबर ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषाने सारे वातावरण भारून गेले आहे. विविध भागातून आलेल्या दिंड्यांनी नदीच्या तीरावर राहुटय़ा उभारल्या असून अनेकांनी अखंड हरिनामाचा सप्ताह सुरू केला आहे. दिवसभर हरिपाठ, कीर्तन, पारायण, भजन असे कार्यक्रम सुरू आहेत. त्यामुळे संपूर्ण देहू भक्तिमय झाले आहे. देहू संस्थानने पालखी सोहळ्यासाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे.
अलंकापुरीतही भाविकांचे आगमन मोठय़ा प्रमाणावर झाले असून आळंदीतील मठ, धर्मशाळा, मंदिरे गजबजली आहेत. त्याचप्रमाणे दिंड्याही आळंदीत दाखल झाल्या आहेत. आळंदी संस्थानने पालखी सोहळ्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली आहे. मंदिराची आणि पालखीची सजावट जवळपास पूर्ण झाली आहे.
