1. धर्म
  2. »
  3. हिंदू
  4. »
  5. हिंदू धर्माविषयी

वारीतलं अध्यात्म

सौ. भाग्यश्री कुलकर्णी

MH GOVT
आषाढधारा चांगल्या बरसू लागल्या की टाळ मृदुंगांचे स्वर कानी पडू लागतात. ग्यानबा तुकारामचा जयघोष घुमू लागतो. बेभानपणे धरतीवर बरसणारा पाऊस आणि टाळ मृदुंगाच्या आवाजात स्वत:ला विसरून विठूनामाच्या गजरात अतिशय तल्लीनतेने नाचणारा तो वारकरी यांच्यात एकच लय आहे असे जाणवते.

कपाळाला गोपीचंदनाचा टिळा त्यावर गंध बुक्का आणि गळ्यात तुळशीची माळ. कपडे भलेही फाटके असतील, पण चेहर्‍यावरून भक्तीरसाचे ऐश्वर्य ओसंडून वाहतंय. वारकर्‍यांचे हे वाह्यरूप.

या काळात आपल्या माऊलीला भेटायला एखादे बालक जेवढे आतुर असते, त्याच आतुरतेने तो झपाझप पावले उचलत पंढरीकडे जात असतो.

विठ्ठलाच्या भेटण्याची आस लागलेला तो, त्याच्या नामात इतका गुंगून जातो की चालण्यातले श्रम, वारा, पाऊस चिखल या कशाचाही त्याला त्रास होत नाही. या निसर्गाचाच तो एक भाग होतो अन् आनंदात गात नाचत तो विठूरायाच्या दर्शनाला निघतो. त्याच्यासोबत असणारी त्याची धरधनीण डोक्यावर तुळशी-वृंदावन घेऊन कपाळावर मोठ्या पैशाएवढा आकाराचे कुंकू, बुक्का, गळ्यात माळ अन् हिरवं पंढरपुरी लुगडं नेसून निघालेली असते. जणू काही चंद्रभागेला भेटायला चाललेली एखादी माहेरवाशीणच.

MH GOVT
या दोघांना बरोबर बघताना मला तर त्यांच्या दर्शनातच विठ्ठलाच्या दर्शनाचा आनंद मिळतो. डोक्यावर मुंडासे, गळ्यात उपरणे, धोतर अशा वेशातला सावळा विठ्ठल, रखुमाईसमवेत दर्शन द्यायला आला आहे असे वाटते. मनात जरी ते चित्र उभे राहीले तरी कंठ आनंदाने दाटून येतो.

विठोबा आपला का वाटत असावा? इतर देवांपेक्षा त्याच्यात आणि आपल्यात भेद नाही असे का वाटते? त्याच्याजवळ गेलं की मनावरचं ओझं का उतरतं? याची उत्तरं वारीतली कुणी देईल किंवा देऊ शकेल ? सांगता येणार नाही. पण या सावळ्याजवळ कुठलाही भेदभाव नाही जात, धर्म, पंथ, वंश सारे भेद वारीत सामील झाले की मिटतात. आपल्या गावातून निघणार्‍या वारीतला प्रत्येक माणुस पुढे एकत्रित वारीला जाऊन शेवटी विठ्ठलाच्या विटेपर्यंत जाऊन पोहोचतो. वाटेत गावकरी देत असलेले जेवण सगळे मिळून जेवतात खाली बसतात. पत्रावळीवर जेवतात. त्या एका घासाची चव पंचपंक्वानांनाही येणार नाही.

MH GOVT
वारी ही फार मोठी परंपरा आहे. जगातून जाती पातीच्या भिंती नाहीशा करण्याचे सामर्थ्य वारीत आहे. वयोवृद्ध असणारे कितीतरी लोकं अविरतपणे वारीस जातात. न चुकता. अगदी दरवर्षी. एवढ्या थकल्या भागल्याच्या पायात बळ देण्याचे काम कोण करतो तो पंढरपुरी शतकानुशतके उभा असलेला विठूच ना.

काळी आई पावसाने न्हाऊन निघते. तिच्या पोटातून अंकुर वर येऊ लागतो. सृष्टीचा हा नवनिर्मितीचा सोहळा आनंद देतो. म्हणूनच तर ज्याने हे निर्माण केले त्या सृष्टीकर्त्याला, नियंत्याला निर्मात्याला तुझं देण किती अगाध आहे. अशीच कृपा आमच्यावर असू दे. आम्ही तुझे उपकृत आहोत. आमच्या घसातला घास आम्ही इतर लोकांना देऊ, अडीअडचणीत एकमेकाना सांभाळू हे सर्व सांगण्यसाठी विठ्ठलाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा धरणीचा राजा त्याला भेटायला जातो.

विठोबाचे ते सावळे सगुण, सालंकृत तुळशीच्या माळा घातलेले रूप बघून तो हर्षोत्फुल होतो. आपण जे काही जगतो, हे त्याचेच देणे आहे, या कल्पनेने वारकरी धन्य होतो. रोजच्या व्यवहारातील चिंता, काळज्या सारे तो विठूपुढे विसरून जातो. तो जणू त्याचा भाग होतो. आणि नंतर जड पावलांनी पुन्हा घरी परततो. पुढच्या वर्षाच्या वारीची वाट पहात.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा