''चिंगी'' - 20 मार्चला भेटीस
|
चिंगी म्हणचे अबालवृध्दांपासून सगळ्यांनाच मस्तपैकी ट्रीट आहे. आजही आपल्या समाजात जुन्या चालीरिती आणि परंपरेचा खोल पगडा आहे. आजही 'मुलगी जन्माला येणे' म्हणजे कमीपणाचे मानले जाते. या सामाजीक प्रश्नावर अनेक प्रकारे प्रबोधन सुरू आहे मात्र, अजुनही म्हणावी तशी जागृकता झालेली नाही.
|
'चिंगी' ही आरतीच्या आयुष्याची कथा आहे. लग्नानंतर तिच्यावरही सासरच्यांचा 'मुलगाच हवा' असा रेटा असतो. ही मागणी तिला अस्वस्थ करत असते. आपल्या आईला पाच मुली असल्याने तिला नेहमीच सासू कडून अपनास्पद ऐकावे लागत असते. मुलगी म्हणून आणि मुलगी नको म्हणून तिच्यावर होणारा अत्याचार या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. आरती हे चित्रपटाचे प्रतिक असले तरी समाजात अशा अनेक आरतींना हा छळ सहन करावा लागत आहे. त्यांची होणारी मानसिक, शारीरीक अवहेलना दाखवून या प्रश्नावर वाचा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. केवळ प्रश्न न मांडता या समस्येचे निराकरण कसे करता येईल, अर्थात मुलीना जन्म देण्याची का गरज आहे आणि मुलींही काय करू शकतात, हे देखील दाखविण्यात आले आहे.
यामध्ये लोकप्रिय कलाकारांचा सहभाग आहे. आरतीच्या भूमिकेत गिरीजा ओक आहेत. सोबत मिलिंद गवळी, रविंद्र गवळी, ईला भाटे, उज्वला जोग, हर्षांली झीने, अरूण बलसावडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पाहुणे कलाकार म्हणून आदिती सारंगधर, मिलन शिर्के, श्वेता शिंदे, स्नेहा वाघ, चारूशिला वाच्छानी, नागेश भोसले, शुभांगी लाटकर, डॉ. विलास उजवणे, कांचन पगारे, संदीप भन्साली आदीं कलाकार आहेत.
अनिता इराणी यांची प्रस्तुती असणा-या या चित्रपटाची भावनाशील कौटुंबिक कथा कुरडे यांनी लिहली असून पटकथा व संवाद अशोक पाटोळे यांचे आहेत. बाबा पाटील यांनी दिग्दर्शन तर नरेंद्र पंडीत यांनी नृत्यदिग्दर्शन केले आहे. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी संगीत दिले आहे. रफीक शेख यांनी छायाचित्रण केले आहे. मुख्य सहाय्यक दिग्दर्शक म्हणून रौफ भंगडावाला यांनी काम पाहिले आहे.
परंपरेने चालत आलेले समज, परंपरा बदलणे हे खरोखरीच येड्यागबाळ्याचे काम नव्हे. पण, चिमुरडी चिंगी या सगळ्यावरचा सहज सोपा उतारा वाटतो. काय जादूची झप्पी असेल बरं या चिंगीकडे? अर्थात हे जाणून घेण्यासाठी आपण आतुरला असाल. आपल्यासाख्या दर्दी प्रेक्षकांना चिंगी आपलसं कसेल, हे नक्की....
