1. मनोरंजन
  2. »
  3. मराठी सिनेमा
  4. »
  5. आगामी नाट्य-चित्र

''मेड इन चायना'' शेतक-यांचा लढा

मेड इन चायना शेतकयांचा लढा
WD
जनमानसात प्रचंड उत्सुकता असणारा 'मेड इन चायना' हा बिगबजेड मराठी चित्रपट 13 मार्चला महाराष्ट्रात सर्वत्र एकाचवेळी प्रदर्शित होत आहे. विशेष म्हणजे प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाला समिक्षकांनी गौरविले असून स्टार-स्क्रीन सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पारितोषिक मिळविण्याबरोबरच नुकताच केरळमध्ये रंगलेल्या 'साईन २००९' महोत्सवात या चित्रपटाला ज्युरींनी डोक्यावर घेतले होते.

'एलिवझर लॉजीकल थिंकर मुव्हीज' ने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. बहुआयामी व्यक्तीमत्वाच्या संतोष कोल्हे यांनी पत्रकार ते मालिका-चित्रपट दिग्दर्शनाचा प्रवास केला आहे. त्यांच्या प्रत्येक कलाकृतीची दखल घेण्यात आली आहे. केवळ मनोरंजन एवढा संकुचि‍त दृष्टीकोन न ठेवता सामाजिक स्थितीवर एक भाष्य करण्यासाठी म्हणून त्यांनी 'मेड इन चायना' प्रेक्षकांसमोर ठेवला आहे.

WD
सध्या ऐरणीवर असणा-या सेझ अर्थात स्पेशल इकॉनॉमिक झोन या विषयावर चित्रपटाचे कथानक बेतण्यात आले आहे. सेझच्या संकल्पनेचं मुळ गाव चीन. इतकाच काय तो चित्रपटाचा चीनशी दुरान्वये असलेला संबंध. सेझ पलीकडे चालणारे राजकारण दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गावात सेझ दाखल होतो आणि सगळी समिकरणंच बदलून टाकतो. गावची सुजलाम्‌ सुफलाम्‌ जमीन, सेझ च्या नांगराखाली दळायला शेतकरी विरोध करतात. पण, सेझच्या या गंगेत हात धुवायला टपलेले राजकारणी, दलाल रेटा लावतात. आणि जिवघेण्या संघर्ष सुरू होतो. शह-काटशहाच्या राजकारणात जनतेच्या भल्याचा कोण विचार करतोय? मोठ-मोठया धनदांडग्यांच्या लढाईत त्याचा टीकाव लागतो? या सगळयांची उकल 'मेड इन चायना' मध्ये पहावयास मिळेल.

WD
चित्रपटाची दमदार कथा- पटकथा व संवाद हे मेड इन चायनाचं शक्तीस्थळ आहे. त्याबरोबरीने चित्रपटाची स्टार- कास्ट, लोकेशन्स ही आणखी एक जमेची बाजू. कलाकारांची व्यक्तीरेखेनुसार अचूक निवड करण्यात आली आहे. यामध्ये संदीप कुलकर्णी, मिलिंद गुणाजी, उपेंद्र लिमये, मृणाल कुलकर्णी, मधुरा वेलणकर, पुजा नायक, शिल्पा नवलकर, कांचन पगारे, आनंद अलकुंटे, उत्तरा बावकर आणि डॉ. शरद भुताडिया यांच्या खास भूमिका आहेत.

WD
'मेड इन चायना' ची कथा संतोष कोल्हे यांची असून पटकथा संतोष कोल्हे व प्रसाद मिरासदार यांनी लिहिली आहे तर संवाद अजय झणकर यांचे आहेत. आशिष पाटील व प्रसाद मिरासदार हे क्रिएटिव्ह प्रोड्युसर असून एकनाथ कदम यांनी कला विभागाचे काम पाहिले आहे. चित्रपटाचे नेत्रसुखद छायाचित्रण धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे. तर स्वरुप आनंद व मिलिंद जोशी यांनी संगीत दिले आहे. सुनिधी चौहान, रविंद्र साठ्ये यांनी गीते गायली आहेत. पार्श्र्वसंगीत शैलेंद्र बर्वे यांचे असून संकलन सचिन नाटेकर यांनी केले आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा