शिक्षणाच्या आयचा घो!
PR
PRआपण ते शिकतो तो आयुष्यात 'इमप्लिमेण्टच' करु शकणार नसू त्याचा उपयोग काय? सध्या तसंच होतंय; शिकण्याचा आणि जगण्याचा काही संबंधच उरलेला नाही. अभ्यासक्रम म्हणजे नुसती 'थिअरी' आणि परीक्षा म्हणजे 'रट्टा'. त्यामुळे दोन गोष्टी तातडीनं बदलायला हव्यात. एक म्हणजे व्यवहारात उपयोगी पडेल असा अभ्यासक्रम हवा आणि परीक्षापध्दती ज्ञानाचे योग्य मुल्यमापन करणारी असावी. म्हणजे घोकमपट्टी करणारे पोपट पहिले येणार नाहीत. भारतातल्या लहान मुलांना दहा वर्ष शालेय शिक्षणाच्या सक्तीच्या शिक्षेला सामोरं जावं लागतं. शारिरीक, मानसिक दृष्टया खचलेला, अभ्यासाच्या जाचाने आणि दप्तराच्या भाराने वाकलेला आजचा विद्यार्थी पाहिला की प्रकर्षाने हे लक्षात येते. २००४ ते २००७ या तीन वर्षातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची १६०० इतकी आकडेवारी पाहून या गंभीर विषयाकडे होत असलेलं दुर्लक्ष ध्यानात येत दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना या विषयावर काम करण्यात प्रवृत्त केले आणि निर्मिती झाली 'शिक्षणाच्या आयचा घो!' या चित्रपटाची.
महेश मांजरेकर दिग्दर्शित 'शिक्षणाच्या आयचा घो!' हा चित्रपट शिक्षण पध्दतीवर भाष्य करीत नसून शिक्षण पध्दती किती चुकीची आहे हे दाखविण्याचा प्रयत्न करतो. संजय छाब्रिया, सत्य मांजरेकर, अश्वमी मांजरेकर निर्मिती असलेला हा चित्रपट १५ जानेवारीपासून राज्यात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
चित्रपटाची कथा घडते मधुकर राणे यांच्या मध्यमवर्गीय कुटुंबात. मधुकर नारायण राणे, आपण लहान असताना आपल्या वडिलांचा आपल्याला जसा धाक वाटायचा अगदी तस्सेच एक वडील... खेळ आणि अभ्यासात त्यांनी नेहमीच अंतर ठेवलंय. त्यांच्या मते, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, एम.एफ.हुसैन सारख्या व्यक्ती केवळ नशिबानेच' जन्माला येतात. अशा विचारसरणींच्या मधुकर राणेंचा मुलगा श्री... श्रीनिवास राणे हा चारचौघांसारखा सर्वसामान्य विद्यार्थी. बौध्दिक कुवत जरी सामान्य असली तरी क्रिकेटचं उपजत कौशल्य घेऊन तो जन्माला आलाय. श्रीमध्ये असलेला हा उपजत गुण त्याच्या वडिलांनाही कधी पटलेला नसून तो दडपून टाकण्यातच इतर पालकांप्रमाणे त्यांनीही मोठ्ठा आनंद मानला. शिक्षणातील अपेक्षांचा भडीमार असहय होवून एकेदिवशी श्री कोसळतो.... अगदी पुरता उध्दवस्त होतो. पण त्यानंतर काय घडतं? हे पडद्यावर पाहणं योग्य ठरेल; मात्र हे सगळे आपल्या मनाला आणि बुध्दीला झिणझिण्या आणणारं ठरेल हे नक्की!
पुस्तकी शिक्षण पध्दती आणि आजच्या तरुणाईची वर्तमानाशी निगडीत असणारी मानसिक गरज यातील तफावत मांडायचा प्रयत्न यात करण्यात आला आहे. या चित्रपटाची कथा-पटकथा दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी लिहिली असून संवाद दीपक कुलकर्णी यांनी लिहिले आहेत.
भरत जाधव, सक्षम कुलकर्णी, गौरी वैद्य, सिध्दार्थ जाधव, क्रांती रेडकर यांच्या भूमिका चित्रपटात पाहायला मिळणार आहे. नलेश पाटील, श्रीरंग गोडबोले, गुरु ठाकूर लिखित या चित्रपटाच्या गीतांना संगीतकार अजित-समीर-अतुल यांनी संगीत दिले आहे.
