''सनई चौघडे'' वीस जूनपासून वाजणार
|
विविध वाहिन्यांवर दिसणारे सनई चौघडेचे चकाचक ग्लॅमरस प्रोमोज, अवधूत गुप्तेचे तरुणाईला धुंद करणारं संगीत, मुक्ता आर्ट्सचा पहिला मराठी चित्रपट तसेच पारंपारिक पोह्यांची 'मॉर्डन रेसिपी' या सगळ्या गोष्टींमुळे या चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता आहे. 'सावरखेड एक गाव' हा चित्रपट देणार्या राजीव पाटील यांनी 'सनई चौघडे'चे दिग्दर्शन केले आहे.
|
'सनई चौघडे' हा लग्न या सोळा संस्कारांपैकी एक असलेल्या संस्काराविषयी आहे. रितसर कांदे-पोह्यांच्या कार्यक्रमापासून ते थेट मांडवात वाजणार्या सनई चौघड्यापर्यंतचा हा प्रवास आहे. आजच्या तरुणाईचा लग्न व्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टिकोन, मुळात लग्न म्हणजे काय? याचा वेध घेणारी ही कहाणी आहे.
|
मुंबई, पुण्यातल्या विविध लोकेशन्सच्या सहाय्याने कला दिग्दर्शक अरुण रहाणे आणि कॅमेरामन पुष्पांक गावडे यांनी चित्रपटाला 'फ्रेश लूक' दिलाय.
आजच्या आधुनिक पिढीची लग्नव्यवस्थेविषयीची रोखठोक वास्तववादी भूमिका आणि परंपरागत लग्नसंस्थेची रुढ चौकट यांच्यातला सामना राजीव पाटील, विवेक गोरे, राजेश कोलान यांनी मांडला असून संजय पवार यांची पटकथा आणि संवाद आहेत.
या चित्रपटातील ताल धरायला लावणारे संगीत अवधूत गुप्ते यांनी दिले आहे. नुकतेच या चित्रपटाच्या ऑडियो सीडीचे प्रकाशन प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका फराह खान यांच्या हस्ते झाले. या चित्रपटाची गाणी तरुण वर्गात चांगलीच गाजताहेत. रॉक स्टाईलचे 'टायटल ट्रॅक' तर सर्वत्र वाजू लागले आहे. अल्पावधीतच तब्बल 12000 सीडी विकल्या गेल्या आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मराठी चित्रपटाच्या बाबतीत हे प्रथमच घडते आहे.
दिग्दर्शक राजीव पाटील यांनी मुक्ता आर्टससारख्या व्यावसायिक संस्थेचा सहकार्यामुळं तांत्रिकदृष्ट्या चित्रपटाला योग्य न्याय देता आले असं नमूद केलं. श्रेयस, कलाकार, तंत्रज्ञ, आमचं पूर्ण युनिट यांनी जीवतोड मेहनत घेऊन हा चित्रपट तयार केलाय. चित्रपटाची पारंपारिक 'मॅचमेकिंग'ची गोष्ट नव्या 'फ्लेवर'मध्ये सांगितली आहे. ही 'डिश' प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
फोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा....
