''सहवास'' चित्रपटाचा मुहूर्त
|
'भैरव फिल्मस्' निर्मित, प्रकाश गायकर दिग्दर्शित 'सहवास' या कौटुंबिक चित्रपटाचा मुहूर्त नुकताच मुंबईत झाला. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे विरोधी पक्षनेते रामदास कदम, शिवसेना नेते व आमदार सुभाष देसाई उपस्थित होते. मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकार, तंत्रज्ञांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या सोहळ्यास राजकारणातील अनेक मान्यवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
'सहवास' चित्रपटाची कथा एक सुखी कुटुंबात घडते. उद्योजक अभयच्या सुखी संसारात त्यांच्या पत्नीची तितकीच मोलाची साथ आहे. आपल्या दोन मुलासबोत मजेत आयुष्य सुरु असतानाच अकस्मात एके दिवशी त्यांच्या आयुष्यात एक संकट येतं. आपल्या महत्वाकांक्षेमुळे, घरापासून दुरावलेला अभय या परिस्थितीला आपल्या कुटुंबासमवेत कशाप्रकारे सामोरा जातो, हे संवेदनशीलरीत्या रेखाटणारा चित्रपट म्हणजे.... 'सहवास'.
या चित्रपटाची कथा-पटकथा कय्युम काझी यांनी लिहिली आहे. चित्रपटात अरुण नलावडे, अश्विनी एकबोटे प्रमुख भूमिकेत दिसणार असून सोबत डॉ. गिरीश ओक, डॉ. विलास उजवणे, जयवंत वाडकर, अंशुमन विचारे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
'श्री ओमकार आर्टस प्रा. लि.' संस्थेने आजवर अनेक म्युझिक अल्बम, व्हिडिओ फिल्मस सोबत दोन यशस्वी चित्रपटांची निर्मिती केली आहे, तर 'भैरव फिल्मस'च्या प्रकाशराव सुर्वे यांनी दहा वर्षापूर्वी केदार शिंदे यांना घेऊन 'बॉम्बे मेरी जान' हे नाटक रंगमंचावर आणलं होतं आणि आता या दोन्ही निर्मिती संस्था 'सहवास' या कौटुंबिक चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आल्या आहेत. नोव्हेंबरच्या दुसर्या आठवड्यात चित्रपटाच्या चित्रकरणास मुंबईत सुरुवात होत असून जानेवारी अखेरीस चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज होईल.
