1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात

मतमोजणी २२ तारखेलाच होणार : चावला

येत्या १३ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या सर्व विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीची २२ ऑक्टोबर ही तारीख बदलली जाणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन मुख्य निवडणूक आयुक्त नवीन चावला यांनी केले आहे. चावला यांनी गुरूवारी (ता.१०) नागपुरात विदर्भ आणि मराठवाड्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

मतमोजणीच्या तारखेचा मुद्दा राजकीय पक्षांचा नसून, प्रसिद्धी माध्यमांचा आहे, असा दावा करीत चावला म्हणाले की, या आधी हरियाणात आम्ही गेलो असता तेथील राजकीय पक्षांनीही मतमोजणीच्या तारखेबद्दल कोणताही आक्षेप घेतला नव्हता. महाराष्ट्रातही काल आणि आज ज्या विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना भेटलो त्यांनीही २२ ऑक्टोबरला मतमोजणी ठेवण्याबाबत कोणताही आक्षेप घेतला नाही. विशेष म्हणजे, मतदान होताच महाराष्ट्रात दिवाळीची धामधूम सुरू होते आणि महाराष्ट्रात हा सण उत्हासात साजरा केला जातो. या काळात कर्मचारीही मोठ्या प्रमाणात रजेवर असतात. त्यामुळे कर्मचार्‍याशिवाय मतमोजणी कशी होणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. १३ ऑक्टोबरला होणार्‍या मतादानादरम्यान काही गैरप्रकार घडले तर त्या मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्यासाठी आम्हाला पुरेसा वेळही मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या लोकसभा निवडणुकीत वापरण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याचे चावला यांनी मान्य केले. लोकसभा निवडणुकीनंतर आम्ही व्यापक प्रमाणात मोहीम हातात घेऊन याद्या दुरूस्त करण्याचे काम केले असून, ३० सप्टेंबरपर्यंत अद्ययावत याद्या तयार व्हाव्यात आणि सर्वांना निवडणूक ओळखपत्र दिले जावे, असे निर्देशही शासनाला दिले असल्याची माहिती त्यांनी दिली. संपूर्ण मतदारयाद्यांचे पुनरीक्षण विधानसभा निवडणुकीनंतर करण्यात देणार असल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

काही राजकीय पक्षांनी चौकात प्रचार सभा घेण्याची परवानगी मागितली आहे. त्यांना ट्रॅफिक पोलिसांची परवानगी मिळाल्यास अशा सभा घेता येतील. ज्या प्रमाणे इलेक्ट्रॉनिक माध्यमात मतदानाच्या ४८ तास आधी प्रचाराच्या जाहिराती थांबविण्यात येतात त्याचप्रमाणे ४८ तास आधी केंद्रिय माध्यमातही जाहिराती देण्यावर बंदी आणावी, अशा सूचना राजकीय पक्षांनी दिल्या असून, ही सूचना विचाराधीन असल्याची माहिती चावला यांनी दिली. मतदान केंद्रांवर मतदारांच्या नावांच्या अकारव्हिल्हे (अल्फाबेटीकल) याा ठेवल्या जाव्यात, अशीही सूचना आली असून, तिच्यावरही विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व राजकीय पक्षांना त्यांच्या दृष्टीने संवेदनशील वाटणार्‍या मतदानकेंद्रांची यादी मागविली असून, त्या ठिकाणी सुक्ष्म निरीक्षक आणि छायाचित्रणाची व्यवस्था केली जाईल. दर दोन मतदारसंघांसाठी एक निरीक्षक याप्रमाणे निरीक्षक नेमण्यात आले असून, २६ सप्टेंबरपर्यंत हे निरीक्षक आपापल्या मतदारसंघात पोहोचतील, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.