1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालगित
  4. Bal Kavita Gavatfula Lyrics in Marathi

गवतफुला

रंगरंगुल्या, सानसानुल्या,
गवतफुला रे गवतफुला;
असा कसा रे सांग लागला,
सांग तुझा रे तुझा लळा.
 
मित्रासंगे माळावरती,
पतंग उडवित फिरताना;
तुला पाहिले गवतावरती,
झुलता झुलता हसताना.
 
विसरुनी गेलो पतंग नभिचा;
विसरून गेलो मित्राला;
पाहुन तुजला हरवुन गेलो,
अशा तुझ्या रे रंगकळा.
 
हिरवी नाजुक रेशिम पाती,
दोन बाजुला सळसळती;
नीळ निळुली एक पाकळी,
पराग पिवळे झगमगती.
 
मलाही वाटे लहान होऊन,
तुझ्याहुनही लहान रे;
तुझ्या संगती सडा रहावे,
विसरून शाळा, घर सारे.
 
कवयित्री- इंदिरा संत
पुढील लेख
श्रीकृष्ण आणि पुतना वधाची गोष्ट