आयएमडीने सोमवारी मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) सोमवारी मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस, ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने वाहणारे सोसाट्याचे वारे आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा विभागाने दिला आहे.
हवामानातील अचानक बदलामुळे ऑरेंज अलर्टचे रेड अलर्टमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. आयएमडीनुसार, सततच्या पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचणे, अचानक पूर येणे, नदीची पातळी वाढणे आणि भूस्खलनाचा धोका आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडू शकतात आणि जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींचे नुकसान होऊ शकते.
कोकण किनारपट्टीवर उंच लाटा आणि खराब हवामानाची शक्यता असून, त्यामुळे रस्ते, रेल्वे, हवाई आणि फेरी सेवा विस्कळीत होऊ शकतात. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) लोकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि झाडे, मोडकळीस आलेल्या इमारती, विजेचे खांब व जाहिरात फलकांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांना समुद्रकिनारे आणि पाणी साचलेल्या भागांपासून दूर राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी बीएमसी आणि इतर सरकारी संस्थांचे सुमारे १५,००० अधिकारी आणि कर्मचारी शहरभर तैनात करण्यात आले आहे.
Edited By- Dhanashri Naik
