वाढदिवसासाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा विहिरीत बुडून मृत्यू
निदा अल्ताफ शेख वय (16) आणि सानिया अल्ताफ शेख वय (18) अशी त्या बहिणींची नावे असून या दोघी आई-वडिलांसोबत अंबाजोगाईतील फॉलोअर्स क्वार्टर भागात राहत होत्या. मुळचे हैदराबादचे राहिवासी असलेले हे कुटुंब अंबाजोगाईत स्थायिक झाले होते. शुक्रवारी सकाळी अल्ताफ यांनी निदा, सानियाला त्यांच्या मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी मोरेवाडीला सोडले होते. मात्र त्यानंतर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह कंपनी बागेच्या विहिरीमध्ये आढळू आला आहे. परिसरात शेळ्या चारण्यासाठी घेऊन आलेल्या एका व्यक्तीला त्यांची पर्स आढळून आल्याने संबंधित प्रकार उघडकीस आला.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि स्थानिक तरुणांच्या मदतीने दोघींचे मृतदेह विहिरीबाहेर काढले. या मुलींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. घटनेचा तपास सुरू असून, घटना नेमकी कशी घडली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच पुढील तपासाची दिशा स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.