आचरेकर सरांमुळे घडलो: सचिन
'
मी जो घडलो, तो आचरेकर सरांमुळे...', असे सांगत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याने गुरू रमाकांत आचरेकर यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या. गुरुपौर्णिमेनिमित्त गुरू-शिष्यांचा गौरव नागपूरात ठाकरे कला व सांस्कृतिक अकादमीतर्फे करण्यात आला. यावेळी सचिनसह विनोद कांबळी आणि प्रवीण आमरे हे आचरेकर सरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उपस्थित होते. समारंभात बोलताना सचिन म्हणाला, 'सरांचे योगदान माझ्या आयुष्यात खूप मोठे आहे. सरांविषयीच्या भावना शब्दात व्यक्त करता येणार नाही. सरांनी आम्हाला घडविण्यासाठी खूप मेहनत घेतली. आज मी जो काही उभा आहे तो सरांमुळेच. त्यांच्यासोबत सराव करताना आम्हाला स्वर्गीय आनंद मिळायचा. सरांबद्दल हृदयात प्रेम आहे. त्यांच्याबद्दल भीती नव्हे, आदर आहे.'आचरेकर सरांनी एकदा मला सामना खेळण्यासाठी पाठवले होते. परंतु मी आमचा सामना सोडून वरिष्ठ खेळाडूंचा सामना पाहण्यासाठी गेलो. यामुळे सर नाराज झाले. त्यांनी मला एक थापडही मारली. त्यावेळी ते म्हणाले, 'इतरांसाठी टाळ्या वाजविण्यात आनंद वाटण्यापेक्षा तुझ्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत' मग सरांचा हा उपदेश आयुष्यभर लक्षात राहिला, असे सचिनने सांगितले. भारतीय इतिहासात ज्या अनेक गुरु-शिष्यांच्या जोडा गाजल्या आहेत त्यात आता आचरेकर सर आणि सचिन तेंडुलकर या जोडीचाही गौरवाने उल्लेख करावा लागतो या शब्दात भारतीय क्रिकेट नियमक मंडळाचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी आचरेकर सर आणि सचिन तेंडुलकरांचा गौरव केला. सरांनी पैसे मिळविण्याचा कधीच विचार केला नाही ते फक्त शिष्य घडवत राहिले. त्यामुळे एकाचवेळी भारतीय कसोटीत त्यांचे तीन-तीन शिष्य देऊ शकले याकडे लक्ष वेधतांना सरांच्या प्रेमापोटी आपला व्यस्त कार्यक्रम बाजूला ठेवून हे सर्व खेळाडू एकत्र आले याबद्दल मनोहर यांनी समाधान व्यक्त केले. आचरेकर सरांनी खेळाडू घडवतांना त्याच्या नैसर्गिक प्रवृत्ती बदलवण्याचा प्रयत्न केला नाही तर त्या विकसित करून खेळाडूंना पुढे नेले, असेही त्यांनी यावेळी सांगितले.आचरेकर सरांनी खेळाडू घडवताना कोणताही भेदभाव केला नाही जे काही त्यांच्याकडे होते ते भरभरून दिले. कारण त्यांची कमिटमेंट ही क्रिकेटची होती या शब्दात कसोटीपटू प्रवीण आम्रे याने आचरेकर सरांचा गौरव केला. पोटच्या मुलाचे निधन झाले असतानाही संध्याकाळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आचरेकर सर मैदानावर आले होते याची आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.प्रकृती अस्वस्थामुळे आपले मनोगत व्यक्त न करू शकणार्या आचरेकर सरांचे छोटेसे मनोगत मंचसंचालिका रेणूका देशकर यांनी वाचून दाखविले. आज इथे आलेल्या माझ्या शिष्यांनी स्वतःला झोकून देत क्रिकेट खेळावे आणि आपल्या चाहत्यांना खूप खूप आनंद द्यावा. या खेळाडूंची किर्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर जावी असे आशीर्वाद त्यांनी यावेळी दिले.अविस्मरणीय सत्कार सोहळा दीप प्रज्वलनाने सुरू झालेल्या या कार्यक्रमात वेदमंत्रांच्या घोषात आणि तुतार्यांच्या निनादात आपले गुरू रमाकांत आचरेकर यांचा सत्कार त्यांच्या पाच शिष्यांनी केला. सचिन तेंडुलकर यांनी शाल-श्रीफळ देऊन तर विनोद कांबळी आणि प्रवीण आम्रे यांनी पुष्पहार अर्पण करून आपली कृतज्ञता व्यक्त केली. समीर दिघे यांनी सन्मानपत्र प्रदान केले तर शरद ठाकरे यांनी गुरूदक्षिणा म्हणून पाच लाख रुपयाची थैली आचरेकर सरांना अर्पण केली. प्रास्ताविकात शरद ठाकरे यांनी नागपूरात रमाकांत आचरेकर फाऊंडेशन गठित करण्यात आल्याची घोषणा केली. या फाऊंडेशनतर्फे होतकरू क्रिकेटपटू खेळाडूंना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. यावर्षी या शिष्यवृत्तीसाठी मुंबईतील १६ वर्षाखालील क्रिकेट चमूचा कर्णधार हरमितसिंग याची निवड करण्यात आली आहे. हरमितसिंग याला आचरेकर यांच्या हस्ते मानपत्र आणि शिष्यवृत्तीचा धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी विदर्भातील रणजी क्रिकेटपटू प्रशांत वैद्य आणि प्रीतम गंधे यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी एका मंचावर एकत्र आले होते. नुकत्याच झालेल्या रियॅलिटी शोमधील वादानंतर आज ते प्रथमच एकत्र आले. दोघांच्याही वागण्यात आज कुठलाही तणाव जाणवला नाही. नागपूरात येताना सकाळी जेट एअरवेजच्या विमानातही ते एकत्रच आल्याची माहिती मिळाली. चार-पाच दिवसापूर्वी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे एकत्र येणे हा उपस्थितांसाठी औत्सुक्याचा विषय होता. आजच्या कार्यक्रमाला वसंतराव देशपांडे सभागृहात नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती. अर्धा तास उशीरा सुरू झालेला हा सोहळा अवघ्या एक तासात संपला. कोणताही फाफटपसारा न करता झालेला सुटसुटीत कार्यक्रम असे याचे वर्णन करता येईल.