बॉलीवूडचा ''क्लिंट इस्टवूड''
|
पन्नासच्या दशकात दीदी व जमाना या चित्रपटातून त्याचे करीयर सुरू झाले. मग रिपोर्टर राजू (१९६२) हा त्याचा पहिला चित्रपट. यात पत्रकाराचा रोल त्याने केला होता. अभिनयाचे कोणतेही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण त्याच्याकडे नव्हते. पण तरीही कॅमेर्यासमोर कसे जायचे त्याला ठाऊक होते. रामानंद सागरच्या आरजू चित्रपटाचा खरा हिरो राजेंद्रकुमार होता.पण छोट्या भूमिकेतही फिरोज खान लक्षात राहिला. असीत सेन यांच्या सफरमध्ये राजेश खन्नाच्या जोडीलाही तो होता. पण दुर्लक्षिला गेला नाही.
हिरो म्हणून कुणी त्याला घेईना म्हणून मग त्याने १९७२ मध्ये स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस सुरू केले. अपराध हा त्याचा पहिला चित्रपट. अगदी हॉलीवूड स्टाईलचा चित्रपट होता तो. मग त्यानंतर धर्मात्मा, कुर्बानी, जॉंबाज हे त्याचे चित्रपट आले. बॉलीवूडला हॉलीवूडी परिणाम देण्याची धडपड होती. म्हणूनच हे चित्रपटही त्या धाटणीचे काढले. हॉलीवूड अभिनेता क्लिंट इस्टवूड यांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. म्हणूनच त्यांनी अशा अनेक चित्रपटातही काम केले. काला सोना, अपराध, खोटे सिक्के हे त्यातलेच.
त्याला लेडी किलर असेही पुढे म्हटले जाऊ लागले. कुर्बानीमध्ये त्याचे व झीनत अमानचे बिनधास्त प्रसंग आजही आठवतील. खाणे-पिणे व ऐश करणे ही त्याच्या जगण्याची त्रिसुत्री होती. ती त्याच्या चित्रपटातही उतरली. त्याचबरोबर एक बेफिकीर वृत्तीही आली. म्हणूनच राज कपूरच्या संगममधील राजेंद्र कुमारचा रोल व मनोज कुमारचा 'आदमी' मधून रोलही त्याने याच बेफिकीरीतून लाथाडला होता. अर्थात, नंतर त्याला याचे वाईटही वाटले.
त्याने आपल्या कुर्बानी या चित्रपटात नाजिया हससलाही गायला लावले. नाजियाचे 'आप जैसा कोई मेरे जिंदगी में आए' हे गाणे गाजले. जॉंबाज फार गाजला नाही. मग दयावान, यलगार, जानशीन व प्रेम अगन हे चित्रपट तर साफ आपटले. मग फिरोज खान हे नावही बॉलीवूडच्या ग्लॅमरच्या दुनियेत झाकोळले गेले. त्यांचे तीन बंधू संजय, अकबर व समीर हेही याच दुनियेत होते. या सगळ्यांत फिरोज खान यांच्यावरच प्रसिद्धीचा झोत जास्त काळ राहिला.
मुलगा फरदीनला पुढे आणण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. पण त्याची गाडी काही रूळावर आली नाही. वय झाल्यानंतरही फिरोज खान यांनी काही रोल केले. त्यात ते लक्षात रहाण्यासारखे होते.
|
त्यांच्या निधनाने एक बिनधास्त, बेफिकीर वृत्तीचा अभिनेता गेला.
