संबंधित माहिती
- भारतात टेलिग्रामवर तात्पुरती बंदी: नीट पुनर्परीक्षेपूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णय
- केंद्र सरकार ने NCERT ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देऊन, त्याला कॅम्पस उघडण्याची आणि अभ्यासक्रम चालवण्याची परवानगी दिली
- मुलींना मिळणार ५० हजारांची मदत? जाणून घ्या सरकारच्या या योजनेबद्दल
- UIDAI चे पालकांना आवाहन; ५ वर्षांवरील मुलामुलींचे अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट करून घ्यावे
- ज्येष्ठ नागरिकांचे महत्त्वाचे हक्क जाणून घ्या; जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिनानिमित्त विशेष माहिती
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; टेलिग्रामवर बंदी, बंदीमागे कारण काय? जाणून घ्या
नीट यूजी २०२६ पुनर्परीक्षा प्रलंबित असल्याने, केंद्र सरकारने २२ जूनपर्यंत टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार आणि एनटीएने म्हटले आहे की, काही टेलिग्राम चॅनेलवर पेपरफुटीचे खोटे दावे, अफवा आणि सायबर फसवणूक पसरवली जात होती, ज्यामुळे परीक्षेच्या निष्पक्षतेवर परिणाम होऊ शकतो. अनेक देशांमध्ये टेलिग्रामवर बंदी घालण्यात आली आहे.
केंद्र सरकारने भारतात टेलिग्राम या मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (पदवीपूर्व), किंवा नीट (यूजी) २०२६ पुनर्परीक्षा सुरक्षित आणि निष्पक्षपणे पार पडावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) २२ जून २०२६ पर्यंत टेलिग्राम सेवा निलंबित करण्याचा निर्देश जारी केला आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेने (NTA) या निर्णयाचे स्वागत केले असून, यामुळे परीक्षेसंबंधित अफवा, पेपरफुटीचे खोटे दावे आणि चुकीची माहिती रोखण्यास मदत होईल, असे म्हटले आहे.
बंदीमागे काय कारण? नीट-संबंधित मुद्दा
माहितनुसार इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C), राज्य पोलीस दल आणि इतर संस्थांनी केलेल्या तपास आणि देखरेखीतून असे समोर आले आहे की, नीट-यूजी पुनर्परीक्षेच्या पेपरमध्ये प्रवेश मिळाल्याबद्दल खोटे दावे पसरवण्यासाठी अनेक टेलिग्राम चॅनेल, ग्रुप्स आणि बॉट्सचा वापर केला जात होता.
नीट परीक्षा आयोजित करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) मते, टेलिग्रामवर अनेक संघटित टोळ्या सक्रिय होत्या, ज्या बनावट पेपर्सच्या बदल्यात विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडून हजारो ते लाखो रुपयांची मागणी करत होत्या.
आता एका सरकारी आदेशानुसार, भारतात टेलिग्रामच्या वापरावर २२ जूनपर्यंत तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. २१ जून रोजी होणाऱ्या नीट (यूजी) २०२६ च्या पुनर्परीक्षेनंतर ही बंदी उठवली जाईल.
सरकारने टेलिग्रामला भारतात ३० जून, २०२६ पर्यंत जुने मेसेज एडिट करण्याचे फीचर बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहे. सायबर गुन्हेगार आणि फसवणूक करणारे परीक्षेनंतर जुने मेसेज एडिट करून त्यात मूळ प्रश्नपत्रिका टाकत असत. यामुळे त्यांना मूळ टाइमस्टॅम्पचा (वेळेचा) गैरवापर करून परीक्षेपूर्वी पेपर फुटल्याचा खोटा दावा करणे शक्य होत असे.
टेलिग्रामलाच लक्ष्य का केले गेले?
पेपरफुटी, सायबर फसवणूक आणि ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये टेलिग्रामचे नाव अनेकदा समोर येते. यामागे अनेक तांत्रिक कारणे आहे:
टेलिग्रामवर खाते तयार करणे खूप सोपे आहे. अनेक देशांमध्ये व्हर्च्युअल किंवा तात्पुरते मोबाईल नंबर उपलब्ध आहेत, ज्यामुळे नवीन खाती तयार करणे सोपे होते.
टेलिग्रामवर हजारो लोकांचे ग्रुप्स आणि चॅनल्स तयार केले जाऊ शकतात. यामुळे एकाच वेळी मोठ्या संख्येने लोकांपर्यंत माहिती किंवा दिशाभूल करणारे संदेश पोहोचवणे सोपे होते.
टेलिग्राम बॉट्स आणि ऑटोमेशनसारखी वैशिष्ट्ये प्रदान करते. सायबर गुन्हेगार स्वयंचलित संदेश पाठवण्यासाठी आणि त्यांना प्रतिसाद देण्यासाठी आणि मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचण्यासाठी यांचा वापर करतात.
टेलिग्रामचे 'एडिट' वैशिष्ट्य जुन्या संदेशांमध्ये बदल करण्याची परवानगी देते. काही लोकांनी परीक्षेनंतर पेपरफुटीचे खोटे दावे तयार करण्यासाठी या वैशिष्ट्याचा गैरवापर केला.
टेलिग्राम ॲप काय आहे आणि कोणत्या देशांमध्ये त्यावर बंदी आहे?
टेलिग्राम हे एक क्लाउड-आधारित इन्स्टंट मेसेजिंग ॲप आहे. ते रशियन नागरिक पावेल आणि निकोलाई डुरोव्ह यांनी तयार केले होते. सध्या त्याचे मुख्यालय दुबई, संयुक्त अरब अमिराती येथे आहे. सुरक्षा, सामग्री आणि सरकारी नियमांचे पालन न करणे यांसारख्या कारणांमुळे अनेक देशांमध्ये या ॲपवर अंशतः किंवा पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
Edited By- Dhanashri Naik
