सुनील तटकरेंचा उमेदवारी अर्ज दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन विधानपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसतर्फे मोहन जोशी यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष आता आमने-सामने आले आहेत. राष्ट्रवादीच्या या कुरघोडीमुळे काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.
शिवसेनेचे आमदार विनायक राऊत हे खासदार झाल्याने विधानपरिषदेची एक जागा रिक्त झाली आहे. मात्र, शिवसेनेने ही पोटनिवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. ही आपल्या वाटय़ातील जागा असल्याचा दावा करून काँग्रेसने या जागेवर आपला हक्क सांगितला होता. याबाबत गेले 2-3 दिवस दोन काँग्रेसच्या नेत्यांची चर्चाही सुरू होती. काँग्रेसकडून मोहन जोशी यांनी आपला अर्ज दाखल केल्यानंतर अर्ज भरण्याची मुदत संपण्यास अर्धा तास शिल्लक असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने काँग्रेसचा गोंधळ उडाला. विधानसभा सदस्यपदाचा राजीनामा देऊन तटकरे यांनी अर्ज दाखल केला असून माघार घेणार नाही, असे ठणकावून सांगितल्याने काँग्रेस नेते चक्रावून गेले आहेत.
विधानसभा निवडणुकीत आघाडी करण्याचा तत्वत: निर्णय दिल्लीत झालेला असताना विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसविरुद्ध उमेदवार उभा करण्याची खेळी राष्ट्रवादीने खेळली आहे. काँग्रेसवर दबाव आणून ही जागा मिळवायची किंवा त्या बदल्यात विधानसभेच्या एक-दोन जास्त जागा पदरात पाडून घ्यायच्या अशी राष्ट्रवादीची रणनीती आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत गुरुवारपर्यंत असून तोवर यातून मार्ग नाही निघाला तर आघाडीतील तणाव वाढण्याची शक्यता आहे.
आघाडीतील कुरघोडीचे राजकारण जोरात असले तरी त्याचा फायदा विरोधकांना घेता आलेला नाही. शिवसेना- भाजपने या निवडणुकीत आपला उमेदवारच उतरवलेला नाही. सध्या विधानसभेतील संख्याबळ 277 असून या पोटनिवडणुकीत विजयासाठी 139 आमदारांचे पाठबळ लागणार आहे. काँग्रेसचे 80, तर राष्ट्रवादीचे सध्या 61 आमदार आहेत. निवडणूक झालीच तर शिवसेना-भाजप काय भूमिका घेणार, कोणाला पा¨ठबा देणार की तटस्थ राहणार, यावर बरेच काही अवलंबून आहे. दोन्ही काँग्रेसला विधानसभा निवडणूक लढायची असेल तर ते संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करतील व निवडणूक बिनविरोध होईल, असा अंदाज असला तरी आता माघार कोण घेणार हा कळीचा मुद्दा आहे.
