बुधवार, 4 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दत्त जयंती
Written By
Last Modified: शनिवार, 7 डिसेंबर 2019 (16:39 IST)

दत्त भक्तांची पंढरी, श्रीक्षेत्र गाणगापूर

गाणगापूर ग्रामी श्रीदत्तगुरू म्हणजेच प्रत्यक्ष देव आहे. गाणगापूरचे माहात्म्य दिवसंदिवस वाढतच आहे. येथे आलेले सर्व भक्त त्यांचा संकटातून तारले जातात. येथे दर्शन मात्रने भक्तांची दु:खे, कष्ट, संकटे नाहीसे होतात. त्यामुळेच ह्या क्षेत्राला एक आगळे वेगळे महत्त्व आहे. 
 
भीमा-अमरजा संगमामुळे या स्थानाला कमालीचे नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झाले आहे. भीमा-अमरजा संगमावरस्नान करून स्वयं दत्त गुरुदुपारच्या वेळेस निर्गुण मठात भिक्षेसाठी गुप्तरुपाने कोणत्याही रूपात उपस्थित असतात. नामस्मरणात तल्लीन झाल्यावर व विश्र्वास ठेवला तर देव दर्शन देतातच अशी भक्तांची श्रद्धा आहे. येथील चराचरात देव आहे अशी समज आहे. 
 
गाणगापुरात घडलेल्या बऱ्याच लीला आहेत. एका शेतकऱ्यावर कृपा करून त्याला अमाप धान्याची प्राप्ती करून दिली. तर एका विणकाऱ्यास एका क्षणात श्रीशैल मल्लिकार्जुनाचे दर्शन झाले. औदुंबराच्या शुष्क काष्ठास पालवी आणली तर असेच अनेक चमत्कार येथे घडलेले आहेत.
 
दत्त मंदिर गाणगापूर
मंदिराच्या आत पश्चिमी कडील बाजूस विघ्नहर चिंतामणीची मूर्ती आहे. ही गणपतीची मूर्ती वालुकामय आहे. ह्या मूर्तीसमोर एक लहान दार आहे. ह्या दारातून आत गेल्यास एका गवाक्षातून त्रिमूर्तीचे दर्शन घडते. ही मूर्ती आसनस्थ आहे. ह्या मूर्तीच्या आसनावर निर्गुण पादुका आहे. ह्या तांबूस, काळसर रंगाच्या गोलाकार अश्या आहेत.
 
गाणगापूर येथील औदुंबर वृक्षाचा महिमा
संगमापासून वरती जाताना पवित्र औदुंबर वृक्ष आहे. ह्या वृक्षामध्ये साक्षात दत्त प्रभूंचा वास आहे असे म्हणतात. ह्या ठिकाणी गणपतीची मूर्ती व पादुका स्थापित करण्यात आल्या आहेत. हजारो भाविक ह्या औदुंबर वृक्षास प्रदक्षिणा घालून व्याधी मुक्त झालेले आहेत. भक्तांची सर्व मनोकामना पूर्ण करणारा हा औदुंबर वृक्ष आहे.
गाणगापूरच्या परिसरात अष्टतीर्थ आहे.
षट्कुल तीर्थ, नृसिंह तीर्थ, भागीरथी तीर्थ, पापविनाशी तीर्थ, कोटी तीर्थ, रुद्रपाद तीर्थ, चक्रेश्र्वर तीर्थ व मन्मथ तीर्थ.
 
भागीरथी तीर्थालाच ‘काशीकुंड’ असे म्हणतात. एका आख्येनुसार एका भक्ताने शंकाराची आराधना करून त्यांना प्रसन्न केले व त्या भक्ताच्या इच्छेनुसार काशीची गंगा तिथे आणली. असे म्हटले जाते कि ह्या पाण्यात स्नान केल्याने पापे नाहीशी होतात.
 
ह्या तीर्थात स्नान केल्याने काळमृत्यू, अल्पमृत्यू नाहीसा होऊन शतायुष प्राप्ती होते, दारिद्र्यनाश होतो, सर्व पापे नाहीशी होतात. आत्मशुद्ध होऊन मोक्षप्राप्ती होते. काशी क्षेत्रातील गंगास्नानाचे पुण्य मिळते. प्रयाग येथील त्रिवेणी संगम् नद्यांच्या स्नानाचे फळ मिळते. जन्मांचे दोष नाहीसे होतात. ज्ञान प्राप्ती होते, वंशवृद्धी होते.
 
श्रीक्षेत्र गाणागापूरचे दिव्य स्थळ, भस्माचा डोंगर
भस्माचा डोंगर या दिव्य स्थळाचा एक विशेष महत्व आहे. येथील पवित्र विभूतीला भक्त घरी घेऊन जातात. हे येथील मुख्य गुरुप्रसाद आहे. श्रीक्षेत्र गाणागापूरचे भस्म प्रसिद्ध आहे. येथे विश्व कल्याणासाठी ऋषी मुनींनी यज्ञ केले होते. ह्याच यज्ञातील विभूती साठवून भस्माचा डोंगर झाला. म्हणून याला भस्माचा डोंगर म्हणतात. अजूनही येथून भक्त ही विभूती घेऊन जातात. तरी पण हा डोंगर तसाच आहे. 
 
ह्या भस्माने पिशाच्च बाधा दूर होते. हे संकटनाशक व आजार दूर करणारी, दृष्टीबाधा दूर करणारी भस्म आहे. येथून भक्त विभूती घेऊन जातात व कल्याणासाठी वापरतात. येथे दररोज हजारोच्या संख्येत भक्त आपल्या व्याधी दूर करण्यासाठी येतात. हे स्थान अत्यंत जाज्वल्य आहे त्यामुळे येथे पावित्र्य ठेवणे बंधनकारक आहे.  
 
पिशाच्च विमोचनाचे हे महा तीर्थ आहे. भक्तांना इथे साक्षात दत्ताचे दर्शन घडते.
 
 
श्रीनिर्गुण पादुका मंदिर (अथवा श्रीगुरूंचा मठ)
हे गाणगापूर गावाच्या मध्यभागी वाड्यासारखे मंदिर आहे. मंदिराच्या पूर्वी आणि पाश्चमी भागास दोन महाद्वार आहे. नगारखाना पश्चिमी द्वारला असून त्रिकाळपूजेत वाजविला जातो. श्रीनिर्गुण पादुका मंदिराच्या पूर्वेस महादेव, दक्षिणेस औदुंबर व त्याचा खालील बाजूस गणपती, महादेव आणि पार्वती ह्यांची मूर्ती आहे. पश्चिमेस अश्र्वत्थय वृक्ष आहे. वृक्षाजवळ नागनाथ, मारुती, आणि तुळसी वृंदावन आहे. मठाच्या दक्षिणभागी श्रीगुरुपादुकांच्या गाभाऱ्यासमोर सभामंडप आहे. 
नित्यक्रम 
 
पहाटे तीन वाजता काकड आरती होते. नंतर साडेपाचाच्या सुमारास कर्पुरारती होते. साडेसहा वाजता तीर्थारती होते. इथे पादुकांवर केवळ अष्टगंध व केशरी गंध लावतात. साडेबाराच्या सुमारास श्रीदत्तप्रभूंना महानैवेद्य दाखवून आरतीचा कार्यक्रम होतो. 
 
श्रींची पालखी गाणगापूर
सायंकाळी दिवे लागल्यावर सात ते साडेनऊ पर्यंत श्रीदत्तगुरुंची पालखी निघते. संध्याकाळची आरती झाल्यावर अलंकाराने सुशोभित दत्तमूर्तीला पालखीत बसवले जाते. मंदिराच्या भोवती तीन प्रदक्षिणा घालतात. भजन, करुणात्रिपदी, पद अष्टक, शेजारती म्हणत-म्हणत सेवेकरी चालतात. नंतर तीर्थप्रसादाचा वाटप होतो.
 
श्रीक्षेत्र गाणगापूरला साजरे केले जाणारे उत्सव .
आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजेच श्री गुरु पौर्णिमेला श्रीव्यासपूजा साजरी करतात. भक्त मंडळी गुरुचरित्र चे पारायण संपूर्ण श्रावण महिन्यात करतात. 
भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा जन्मोत्सव साजरा होतो.
दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघनासाठी श्रींची पालखी सायंकाळी श्रीकल्लेश्र्वर मंदिरात जाते.
आश्र्विन वद्य द्वादशीला श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा अवतारसमाप्तीचा उत्सव साजरा केला जातो.
नरक चतुर्दशीच्या दिवशी सर्व भाविक भक्त अष्ट तीर्थ स्नान करण्यासाठी जातात. 
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी श्रीदत्तप्रभूंची पालखी संगमावर जाते. रात्री भजनाचा व नामस्मरणाचा गजर केला जातो. 
मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीला दत्तजयंती निमित्त मोठा उत्सव होतो. दुपारी बारा वाजता दत्तजन्म साजरा करण्यात येतो.
पौष शुद्ध द्वितीयेला श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.
माघ वद्य प्रतिपदा श्रीक्षेत्र गाणगापूर येथे साजरा होणारा सर्वात मोठा उत्सव आहे. प्रतिपदेपासून चतुर्थीपर्यंत इथे मोठी यात्रा भरते. ह्या दिवशी श्रीमहाराज श्रीशैल्यगमनास जातात. चतुर्थीच्या दिवशी श्रीदत्तप्रभूंची पालखी रुद्रपाद तीर्थांहून पुनश्र्च मठात येते.
 
कसे पोहचाल आणि थांबण्याची सोय
पुण्याहून या गाणगापूर स्थानाकाचे अंतर 327 किमी आहे. तिथून मंदिर 21 किमी असून तेथे जाण्यासाठी बस तसेच खासगी वाहन मिळतात. येथे राहण्यासाठी अनेक धर्मशाळा व मठ आहेत ज्या माफक दराच्या आहे व भोजनासाठी अन्नछ्त्र मंडळात सोय होऊ शकते.
श्री वासुदेवानंद सरस्वती धर्मशाळा.
श्रीविश्र्वेश्र्वर मठ
श्री दंडवते स्वामीमहाराजांचा मठ