- मनोरंजन
» - बॉलीवूड
» - चित्रपट समीक्षा
एक डाव भूतनाथचा!
निर्माता- बी. आर. चोप्रा व रवी चोप्रादिग्दर्शक- विवेक शर्मासंगीत-विशाल शेखरकलावंत- अमिताभ बच्चन, अमन सिद्दीकी, जूही चावला, शाहरूख खान, सतीश शाह, राजपाल यादव, प्रियांशू चटर्जी भुताचे चित्रपट म्हटले म्हणजे चित्रविचित्र दिसणारे भूत, त्याचे विविध कारनामे, बर्याचदा भीतीपेक्षा गलिच्छ, बीभत्स वाटणारे असे सारे काही डोळ्यासमोर येते. घाबरविण्यात यशस्वी ठरलेले भूतपट फार कमी आहेत. भूतनाथमध्येही भूत आहे. पण ते घाबरवणारे नाही आणि इथूनचा हा चित्रपट इतरांपेक्षा वेगळा ठरतो. यातील भूत जित्याजागत्या मनुष्यासारखे आहे. त्यालाही ह्रदय आहे. संवेदना आहेत. दुःख आणि आनंदाच्या भावना त्यालाही स्पर्शून जातात. या चित्रपटाच्या कथेला दिग्दर्शक विवेक शर्माने अतिशय कौशल्याने हाताळले आहे. त्यामुळे हा चित्रपट एक छान अनुभव ठरतो. बंकू (अमन सिद्दीकी) त्याची आई (जुही चावला) व वडिल (शाहरूख खान) यांचे कुटुंब आहे. गोव्यात त्यांना कंपनीतर्फे कैलाशनाथ यांच्या जुनाट हवेलीत रहाण्यासाठी जागा मिळते. पण या हवेलीत भूत आहे, अशी वदंता पसरलेली. हा भूत म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून कैलाशनाथच (अमिताभ बच्चन) असतो. या भुताला या कुटुंबाने आपल्या घरात रहावे हे पसंत नसते. म्हणून तो बंकूला घाबरविण्याचा प्रयत्न करतो. पण त्याच्यावर याचा काहीही परिणाम होत नाही. बंकू त्याला भूतनाथ नावाने हाक मारायला लागतो आणि त्यांच्यात चक्क दोस्तीही होते. दोघेही मस्त मजा करतात. भूतनाथ फक्त बंकूलाच दिसतो. पण एक दिवस कैलाशनाथचा मुलगा हवेली विकायच्या इराद्याने अमेरिकेहून परततो आणि कथेला इथेच वळण मिळते.
दिग्दर्शकाने छोट्या छोट्या दृश्यातून संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. स्पोर्ट्स डेला बंकू मैदानावर सतत हरत असतो. त्याला वाटते भूतनाथने येऊन मदत करावी आणि आपण जिंकावे. मुंगीचे उदाहररण देऊनही भूतनाथ त्याला चमत्कार वगैरे काही नसते असे पटवून सांगतो. मेहनतीनेच यश मिळू शकते, हे त्याच्या मनावर ठसवतो. नवी पिढी करीयरला महत्त्व देते आणि आई-वडिला मात्र उपेक्षित रहातात. हेही यातून दाखविले आहे. दिग्दर्शक विवेक शर्मांची चित्रपटाच्या तंत्रावर चांगली पकड असल्याचे दिसून येते. हा त्यांचा पहिला चित्रपट आहे, असे चुकूनही वाटत नाही. चित्रपट पहाता पाहता लोक त्यात गुंतून जातात. वास्तविक पात्र कमी असूनही नीरस वाटत नाही. पण अर्थात चित्रपटात काही कच्चे दुवेही आहेत. मध्यंतरापूर्वीचा भाग छान मनोरंजक आहे. पण त्यानंतर चित्रपट एकदम गंभीर होतो. लहान मुलांऐवजी मोठ्या माणसांसाठी हा भाग बनवला असे वाटते. या भागात काही मनोरंजक दृश्ये हवी होती. चित्रपटाचा शेवटही वेगळा आहे. त्यामुळे तो सगळ्यांना आवडेल असे नाही. शेवटचा एक तास चित्रपट लांबल्यासारखा वाटतो. तो कमी करता येऊ शकतो. संगीत साधारण आहे. जावेद अख्तरची गाणी अर्थवाही आहेत. पण विशाल शेखर त्याला न्याय देऊ शकले नाहीत.
अमिताभ बच्चन 'आफ्टर ऑल' सगळ्यांवर प्रभाव पाडतात. भूतनाथचे पात्र त्यांनी अतिशय बारकाईने आणि त्यातल्या भावभावनांसहित पेलले आहे. अमन सिद्दीकीनेही अमिताभ यांना अभिनयात चांगलीच 'टक्कर' दिली आहे. नैसर्गिक अभिनयाने तो लक्षात रहातो. शाहरूख खान चित्रपटात अधून मधून येतो. जूहीची भूमिकाही छान. प्रिंसिपल सतीश शहाची भूमिका मुलांना हसवणारी आहे. राजपाल यादवला फार संधी मिळालेली नाही. एकूणात भूतनाथ हा 'फॅमिली एंटरटेनर' आहे. लहान मुलांसमवेत मोठेही हा चित्रपट बघू शकतात आणि तो एंजॉयही करू शकतात.