टिटवाळ्याचा महागणपती
|
टिटवाळ्याचा महागणपती! महाराष्ट्रातल्या अष्टविनायकांप्रमाणेच हे श्रीगणपती क्षेत्रही प्रसिद्ध आहे, असे म्हणतात. याच परिसरात पूर्वी कण्व ऋषींचा आश्रम होता. शकुंतला इथेच वाढली. त्यामुळेही या ठिकाणाला एक प्राचीन महत्त्व आहे. टिटवाळा हे छोटेसे गाव मुंबईपासून ६५ किलोमीटर अंतरावर आहे. टिटवाळा स्टेशनवर उतरले की, मंदिरात जाण्यासाठी रिक्षा मिळतात. पण आश्चर्य म्हणजे इथल्या रस्त्यावर अजूनही टांगे धावतात. टप.. टप.. आवाज करत धावणार्या टांग्यांमध्ये बसून मंदिरापर्यंत जायला लहान-मोठे सगळ्यांनाच आवडते.
|
या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे गाभार्यात प्रवेश केल्यापासून ते सभा मंडपातून बाहेर पडेपर्यंत मूर्तीचे सतत दर्शन आपल्याला होत राहते. मंदिराच्या आवारात एक छोटी दिपमाळ आहे. या मंदिरापासून काही अंतरावर एक तलाव आहे. हा एकंदर परिसरच खूप रमणीय आहे. आंबा, करवंद, जांभळे असला रानमेवा बघून भल्या भल्यांच्या तोंडाला पाणी सुटते.
टिटवाळ्याचा असा हा महागणपती! मन:शांती देणारा, भक्तांच्या हाकेला धावणारा आणि हो धकाधकीच्या जीवनात विरंगुळ्याचे काही क्षण भक्तांच्या ओंजळीत अलगदपणे घालणारा!
साभार- महान्यूज
