करणें तें अवघें बरें ।
ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर
MHNEWS |
कोणत्याही परिस्थितीत मन शांत, समाधानी राहू शकते आणि मन असे असल्याशिवाय तुम्हाला अंगीकृत कार्यात अपेक्षेप्रमाणे काम करता येणार नाही. मन प्रसन्न असेल, समाधानी असेल, तर आणि तरच तुम्ही हाती घेतलेल्या कामात स्वत:ला झोकून देऊ शकता. शेवटच्या चरणात तुकोबा सांगतात, तुका म्हणे जीवें आधीं मरोनि राहावें ।। मरोनि राहावे म्हणजे काय ? मेल्यानंतर कोण राहाणार ? अहो, इथे तुकोबांना ते मरण अभिप्रेत नाही. तुकोबा सांगतात. जिवाला म्हणजे आपल्या मनाला. अंत:करणाला, कशाचीही अपेक्षा-आकांक्षा न ठेवता जगण्याची सवय लावा. आपल्या आशा-आकांक्षा नष्ट झाल्या की मग बेधडकपणे वागणे शक्य होते. ज्या सरकारी अधिकार्याला स्वत:च्या मनाप्रमाणे वागावयाचे असेल, स्वत:च्या मनाप्रमाणे लोकांच्या उपयोगी पडावयाचे असेल तर त्याने आपले मन लाच म्हणून मिळू शकणार्या पैशामध्ये गुंतविता कामा नये. आपल्याला इतके पैसे मिळाले पाहिजेत, अशी आकांक्षा मनात ठेवता नये. तसा जर तो मनाशी वागला तरच तो निर्भीडपणे व्यवस्थित स्वत:चे काम करु शकेल. समजा, कोणी सरकारी अधिकारी आहे, त्याने प्रथम आपले स्थान, आपली खुर्ची स्थिर करुन घेतली पाहिजे. कोणीही यावे आणि टिचकी मारुन जावे, अशी अवस्था राहू देता कामा नये. मग ते काही करावयाचे असेल ते सहजपणे करणें तें अवघैं बरें असे होते आणि स्थानाच्या भक्कमपणाची जाणीव झाली की मग तुम्ही त्या भक्कमपणावर विसंबून पुढचे पाऊल टाकू शकता.
तुकोबांनी अवघ्या चार चरणांच्या अभंगात व्यवहारज्ञानाचे सार आपल्यासमोर मांडले आहे. येथे उदाहरणादाखल आपण सरकारी अधिकार्याचा विचार केला. पण कोणत्याही कामात आपले स्थान, आसन निश्चित करुन घेऊन मग पुढचे पाऊल टाकावे. म्हणजे मनाला समाधान लाभते आणि कामही आपल्या इच्छेप्रमाणे होऊ शकते. आता स्थान बळकट कसे करावे, त्याचा विचार तुकोबांनी अन्यत्र केला आहे.
