मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. धोका चिनी ड्रॅगनचा
Written By अभिनय कुलकर्णी|

भारत- चीन युद्ध होईल काय?

भारत आणि चीनमध्ये युद्ध होण्याची शक्यता आहे काय? आंतरराष्ट्रीय अभ्यासकांची मते लक्षात घेता अशी शक्यता आहे, पण ती अंधुक. अभ्यासकांच्या मते, भारत-पाकिस्तान संबंधात चीनचा हस्तक्षेप, तिबेटमध्ये चीनचा वाढता हस्तक्षेप आणि उभय देशातील अद्यापही न मिटलेला सीमाप्रश्न या तिन्ही किंवा यापैकी एका मुद्यावरूनही दोन्ही देशांत युद्ध होऊ शकते.

भारत-पाक युद्ध झाल्यास चीन यात हस्तक्षेप करेल हे उघड आहे. कारण दक्षिण आशियात भारत आणि पाक असा सत्तेचा समतोल राखणे हे चीनचे उद्दिष्ट आहे. म्हणूनच पाकचे पारडे कमी पडतेय हे लक्षात आले की त्याला आधार द्यायचे चिनी धोरण आहे.

भारत चीनकडे व्यूहात्मक दृष्ट्या लक्ष देतोय असं म्हटल्यावर ते लक्ष दूर करण्यासाठी पाकिस्तान सक्षम आहे. म्हणूनच चीनला भिडलेल्या पूर्व सीमांवरून भारताला पश्चिम सीमांकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी लागणार्‍या आगळिकीही या देशाकडून सातत्याने केल्या जात आहेत. म्हणूनच आपण नेहमीच चीनपेक्षा पाकिस्तानकडे जास्त लक्ष देत आहोत. दुर्देवाने चीनकडे दुर्लक्ष करत आहोत. आपले परराष्ट्रधोरण पाकिस्तानभोवतीच घुटमळत राहिल्याने भारताची शक्तीही मर्यादीत झाली आहे. किंबहूना भारताला दक्षिण आशियापुरताच तेही उपखंडापुरताच मर्यादीत ठेवण्याचा चीनचा मनसुबाही यशस्वी ठरला आहे. चीनप्रमाणेच आशियाई किंवा जागतिक पातळीवर एक बडा खेळाडू म्हणून पुढे येण्याचे भारतीय मनसुबे पाकिस्तानी कारवायांनी हाणून पाडले आहेत. त्यामुळे आशियातील चीन हीच एकमेव शक्ती म्हणून पुढे येते आहे.

भारताला डोकं वर काढू देऊ नये म्हणून चीनने कायम पाकिस्तानला मोठे करण्याचा मार्ग अंगीकारला. पाकच्या लष्करी विकासाला, क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाला आणि अंतिमतः अण्वस्त्रसज्ज होण्याला चीननेच सहकार्य केले. १९७४ मध्ये भारताने अणू चाचणी केल्यानंतर चीनने पाकला त्यासाठी प्रेरीत केले. त्यासाठी लागणारी सर्व मदत पुरवली. आता भारताबरोबर पाकही अण्वस्त्रसज्ज देश बनला आहे. त्यामुळे चीनला अपेक्षित दक्षिण आशियातील सत्तासमतोलही साधला गेला आहे.

अशा वेळी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्द झाल्यास चीन हस्तक्षेप करेल काय? याची शक्यता कमीच वाटते. त्याऐवजी चीन पाकला लष्करी साहित्य आणि राजकीय पाठिंबा देईल. शिवाय अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, रशिया, जपान आणि इतर देशांच्या मदतीने भारतावर पाकविरोधातील युद्ध थांबविण्यासाठी दबाव आणेल. त्यामुळे उपखंडातील परिस्थिती 'जैसे थे' राहू शकेल.

अर्थात, अशाही परिस्थितीत भारत या दबावाला बळी न पडता, वर्षानुवर्षे भिजत पडलेला पाकिस्तान प्रश्न एकदाच काय तो सोडवायचा या हेतूने आग्रही राहिल्यास मात्र चीन नक्कीच हस्तक्षेप करेल. पण याचे स्वरूप वेगळे असेल. त्यासाठी चीन सैन्याची हालचाल करून ते भारताच्या सीमेपर्यंत आणून ठेवेल. उभय देशातील संबंधात तणाव निर्माण होईल असे काही करेल. उभय देशांच्या सीमेवर तणाव वाढविण्यासाठी आगळीक करेल. त्यामुळे सहाजिकच भारताला पश्चिमेकडून आपले लक्ष पूर्वेकडे हटवावे लागेल.

त्यानंतरही भारताने धूप न घातल्यास मग मात्र चीन भारताशी युद्ध पुकारून दक्षिण आशियातील सत्तासमतोल राखण्यसाठी थेट कारवाई करेल. अर्थात, हे एवढे सोपे नाही. ही घडेल त्यावेळी चीनही सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेऊनच मगच कोणतेही पाऊल उचलेल. आपल्या हस्तक्षेपाचे काय परिणाम होतील याची काळजी चीनलाही करावी लागेल. भारत-पाक युद्धातील प्रत्यक्ष स्थिती काय आहे आणि भारतीय लष्कराची ताकद नेमकी किती आहे, याचा अंदाज आल्यानंतरच चीन कोणतेही पाऊल उचलेल हे नक्की.

शिवाय त्यावेळी अमेरिका आणि पाश्चात्य जगतही शांत बसणार नाही. चीनने भारतावर हल्ला केल्यास तेही चीनची कोंडी करू शकतात. त्यावेळी चीनला या सगळ्यांना आपल्या बाजूने वळविणे अवघड जाईल. शिवाय भारताचे राजनैतिक कौशल्यही पणास लागेल. यात अमेरिकने बघ्याची भूमिका घेऊन चीनच्या कारवायांबाबत काहीच भूमिका न घेतल्यास अर्थातच चीन भारतावर हल्ला करेल.

तिबेटप्रश्नावरून चीन आणि भारत यांच्यात युद्ध होण्याची शक्यता सध्या तरी वाटत नाहीये. त्यातच चीनने तिबेटमध्ये हान वंशीय लोकांचे जाणीवपूर्वक स्थलांतर करवून आणल्यामुळे तिबेटींची संख्या त्यांच्याच प्रांतात कमी झाली आहे. त्यामुळे स्वतंत्र तिबेटसाठी सुरू असलेल्या चळवळींनाही आता फारसा अर्थ उरलेला नाही.

सीमाप्रश्नावरून चीन आणि भारत यांच्यात युद्ध होण्याची शक्यता दुस्तर वाटते. अरूणाचल प्रदेश हा आपला प्रदेश असल्याचे चीनचे मत आहे. भारताने हा भाग बळकावल्याचे चीनचे म्हणणे आहे. हा भाग पुन्हा मिळविण्यासाठी चीन युद्ध करेल याची शक्यता खूपच कमी वाटते.

या प्रश्नावरून जाहिररित्या बोलणे चीन टाळते. पण राजनैतिक स्तरावर यावर चर्चा होते.

चीन एकीकडे अरूणाचल प्रदेशवर दावा करत असताना अक्साई चीन हा आपला भाग असल्याचे भारताचे म्हणणे आहे. १९६२ च्या युद्धात चीनने हा भाग बळकावल्याची भारताची तक्रार आहे. हा भाग भारताला देणे चीनला परवडणारे नाही. कारण पश्चिम तिबेट नियंत्रणात राखण्यासाठी चीनला हा भाग आपल्याकडे असणे गरजेचे आहे. या भागातून रस्ते तयार करून तिबेट ताब्यात राखणे चीनला शक्य आहे. तरीही हा भाग चीन सोडू इच्छित असल्यास त्या मोबदल्यात त्यांना पूर्वेकडील काही भाग द्यावा लागेल.

पण भारताने पूर्व भाग दिल्यास आणखी एक गोची होऊ शकते. अरूणाचल प्रदेशातील तवांग आणि तिबेटमधील चुंबी या दरम्यान असलेले भूतानही चीन आपल्या घशात घालेल. भूतानचे लष्करी संरक्षण करण्याची जबाबदारी भारताची आहे. त्यामुळे त्याच्या संरक्षणासाठी का होईना भारताला चीनशी युद्ध पुकारावे लागेल.

त्यामुळे एकुणातच सीमाप्रश्न हा तसाच ठेवण्यास उभय देश प्राधान्य देतील असे वाटते.

आता उभय देशांच्या सैन्यांकडून परस्परांच्या देशात घुसखोरी, पेट्रोलिंग करताना इकडे तिकडे जाणे, रस्ता चुकणे हे प्रकार घडतात. पण त्यातून युद्ध होईल असे वाटत नाही. दोन्ही देशांची सरकारेच तसे घडू देणार नाहीत. सुमदुरोंग चू च्या मुद्यावरून १९८७ मध्येही असेच घडले होते.

अर्थात, म्हणून सीमाप्रश्नावरून या देशांमध्ये तणातणी रहाणारच नाही, असे नाही. कारण ईशान्य भारत हा दिसायला चिंचोळी पट्टी असला तरी बराच मोठा भूभाग आहे. भारताच्या सीमेपलीकडे चीन मजबूत आहे. त्यामुळे सीमाप्रश्नावरून युद्ध झाल्यास भारतासाठी मोठा धक्का म्हणजे त्याला पूर्वेकडील भाग गमवावा लागू शकेल. पण त्याचवेळी हा सीमाप्रश्न सुटल्यास भारतावर दबाव आणण्याचे चीनचे शस्त्रच बोथट होईल. अरूणाचल प्रदेशच्या मुद्यावरून भारताला धमक्या देणे आणि त्याचवेळी पाकिस्तानला सर्वबाबतीत मदत करणे असा 'समतोल' चीन आतापर्यंत साधत आहे. हा समतोल त्यानंतर बिघडून जाईल. भारतावर दबाव टाकण्याचा मुद्दाच हातातून निसटून जाईल. त्यामुळे चीन असे काही करेल असे वाटत नाही.

थोडक्यात काय, तर चीन आणि भारत यांच्यात जुंपू नये म्हणून पाक तिकडे कारवाया करत राहिल आणि पाकिस्तानशी भारत भिडू नये यासाठी चीनच्या पूर्वोत्तर बाजूलाही आगळिकी अधून मधून चालूच रहातील.

थोडक्यात दक्षिण आशियातील सत्तासमतोल राखण्यासाठीचा हा चिनी फॉर्म्युला आहे.
(संकलन- अभिनय कुलकर्णी)