1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By भाषा|
Last Modified: एथेंस , गुरूवार, 28 जून 2007 (14:57 IST)

युरोपात उष्णतेची लाट

युरोपात उष्णतेची लाट
दक्षिण युरोपात उष्णतेच्या लाटेत अनेक लोक आजारी पडले असून उत्तर युरोपात मात्र उलट स्थिती आहे. ब्रिटनमध्ये तर पुरामुळे चार जणांना प्राण गमवावे लागले आहेत.

ग्रीसमधील अधिकाऱ्याने सांगितले, की इतिहासातील उष्णतेची ही सर्वात मोठी लाट असून त्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. प्रसारमाध्यमांनी मात्र दहा जण मृत झाल्याचा दावा केला आहे. येथील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने खासगी रेडिओला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, की हवामानाची ही स्थिती अभूतपूर्व असून सलग आठ दिवस उष्णतेची लाट यापूर्वी कधीही राहिलेली नव्हती.

राष्ट्रीय हवामान विभागाने काल एथेंसचे तापमान 46.2 नोंदले आहे. 1955 नंतर प्रथमच पाऱ्याने ही पातळी गाठली आहे. हा पारा आज काही प्रमाणात उतरण्याची शक्यता आहे. उष्णतेमुळे देशभरात तसेच जंगलात आगी लागण्याचे प्रमाण वाढले आहे.

रोमानियाच्या दक्षिण भागात काल रात्री वादळाने थैमान घातले. यात ट्रकवर झाड पडून एक जण मरण पावला. या भागात उष्माघाताने 29 बळी घेतले आहेत. काल राजधानी बुखारेस्टमध्ये येथील सर्वाधिक म्हणजे 45 अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले.