1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात

मतदार नावनोंदणी २५ सप्टेंबरपर्यंत

मुंबई उपनगर जिल्हयातील २६ विधानसभा मतदारसंघामध्ये ७१ लाख ५५ हजार २२४ मतदारांची नोंदणी करण्यात आली असून २५ सप्टेंबर २००९ पर्यंत नाव नोंदणी प्रक्रिया सुरु राहील, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विश्वास पाटील यांनी दिली.

वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी ना.पां.जाधव, उपजिल्हाधिकारी भालचंद्र ठाकरे आदी उपस्थित होते.

पाटील पुढे म्हणाले की, अंतिम छायाचित्र मतदार यादी ३१ ऑगस्ट रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. याबाबत काही हरकत असल्यास मतदारांनी संबंधित मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधावा. जवळपास ५६ टक्के मतदारांना मतदान ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी ६९ लाख ४८ हजार ५४५ मतदारांची नोंद करण्यात आली होती. त्यामध्ये सध्या २ लाख २९ हजार ६६३ नवीन मतदारांची भर पडून एकूण मतदार संख्या ७१ लाख ५५ हजार २२४ इतकी झाली आहे. नवीन मतदारांपैकी ४० टक्के मतदार हे कॉलेज युवक आहेत.

ते पुढे म्हणाले की, ओळखपत्र मिळवण्यासाठी येत्या चार दिवसात ऑनलाईन प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. याद्वारे आपली माहिती भरुन मतदार सहा तासात आपले ओळखपत्र घेऊन जाऊ शकतात. रेशन कार्डच्या वापरांसंबंधी केंद्रीय निर्वाचन आयोगाच्या निर्णयाची आम्ही वाट पाहत असून परवानगी दिल्यास रेशन कार्डची सत्यता तपासण्यासाठी मतदारसंघनिहाय रेशनिंग निरीक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. रेशनिंग कार्डसंबंधी कोणतीही शंका उपस्थित झाल्यास या निरीक्षकामार्फत तातडीने त्याची पडताळणी केली जाईल. याबरोबरच काही ठराविक मतदान केंद्रांवर सहायकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. हे सहायक मतदारांना कोणत्या केंद्रामध्ये मतदान करायचे आहे याची माहिती तात्काळ देतील.

निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून यासाठी पोलिसांव्यतिरिक्त ४२ हजार कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. निवडणुकीसंबधी कोणतीही माहिती मिळविण्यासाठी नागरिकांनी १२९० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही पाटील यांनी यावेळी केले.