मराठा समाजाला आरक्षण मिळावे - ना. जानकर
अन्य जातीच्या आरक्षणाप्रमाणेच मराठा समाजाला देखील आरक्षण मिळाले पाहिजे अशी आपली स्वत:ची भूमिका आहे. मराठा समाजाच्या आणि तरुणांच्या प्रगतीसाठी मराठा तरुणांनी आपण उद्योजक कसे होऊ याचा देखील विचार केला पाहिजे असे प्रतिपादन पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केले.
नाशिकमध्ये आयोजित एका कार्यक्रमासाठी आलेल्या महादेव जानकर यांनी आरक्षणाविषयची आपली भूमिका माध्यमांसमोर मांडली. ज्या त्या समाजाचे सामाजिक आरक्षण त्यांना मिळालेच पाहिजे याचा अर्थ एकाचे काढून दुसर्याला आरक्षण मिळावे असा होत नाही. मराठा समाजाच्या तरुणांनी देखील आरक्षणाची मागणी करण्याबरोबरच आत्मचिंतन करून आपण उद्योजक कसे होऊ तसेच स्पर्धा परीक्षांमधून आयएएस, आयपीएस होण्याचाही विचार करून प्रगती साधली पाहिजे असेही जानकर म्हणाले. कोपर्डी प्रकरण निश्चितच अन्यायकारक आहे. खरेतर गुन्हेगाराला कोणतीही जात नसते, त्यांना जातीशी जोडने योग्य नाही. असे ते पुढे म्हणाले.
