मंगळवार, 19 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र-समीक्षा
Written By
Last Modified: शनिवार, 27 फेब्रुवारी 2016 (16:05 IST)

बाबांची शाळा : चित्रपट परीक्षण

निर्माती - विलास माने आणि उमेश नाथाणी 
दिग्दर्शक - आर. विराज   
पटकथा - पराग कुलकर्णी
संवाद - पराग कुलकर्णी
संगीत - अजित-समीर 
कलावंत -  सयाजी शिंदे, शशांक शेंडे, ऐश्वर्या नारकर, कमलेश सावंत, छाया कदम, आरती मोरे, कार्तिक चव्हाण, उमेश बोळके, मिलिंद अधिकारी, बालकलाकार गौरी देशपांडे
सध्या मराठी चित्रपटांतील कथांमध्ये आलेले वैविध्य पाहता, रसिकप्रेक्षक सत्य घटनेवर आधारित चित्रपट पाहण्यात विशेष रस घेतात, असे आढळून आले आहे. हीच बाब लक्षात घेऊन, आयडिया एन्टरटेन्मेंट निर्मितीसंस्थेने अशाच एका हृदयस्पर्शी कथेवर आधारित ‘बाबांची शाळा’ हा चित्रपट बनवला आहे, ज्याचे दिग्दर्शन आर. विराज यांनी केले आहे. नीला सत्यनारायण यांच्या कथेवर हा चित्रपट आधारला असून, २६ फेब्रुवारीपासून महाराष्ट्रातील चित्रपटगृहात तो दाखल झाला आहे.    
 
विलास माने आणि उमेश नाथाणी निर्मित या चित्रपटाची कथा तुरुंगातील कैदी आणि त्यांच्या कुटुंबियांवर भाष्य करते. एखाद्याने केलेला गुन्हा आणि त्यासाठी त्याला मिळणारी शिक्षा, ही केवळ त्याच्यापुरतीच मर्यादित नसून, त्याची झळ संपूर्ण कुटुंबाला सोसावी लागते, याचे विदारक चित्रण ‘बाबांची शाळा’ चित्रपटाद्वारे सादर केले आहे. आपल्या गुन्हाची शिक्षा भोगणारा महीपत घोरपडे, त्याची मुलगी सोनाली, तुरुंगाधिकारी श्रीकांत जमदाडे आणि सामाजिक कार्यकर्त्या नीता साटम या चार मुख्य पात्रांभोवती या चित्रपटाची कथा गुंफली गेली आहे. 
कुठलाही गुन्हेगार हा जाणून-बुजून गुन्हा करत नाही. त्या गुन्ह्यास तेव्हाची त्याची परस्थिती, मन:स्थिती तितकीच जबाबदार असते, हे सिनेमात दाखवलं गेल आहे आणि हे दाखवताना कुठेही गुन्ह्याचं समर्थन केलेलं नाही. गुन्हेगाराला केलेल्या गुन्ह्याबाबतचा कैद्यांना जितक्या यातना भोगाव्या लागतात तितक्याच किंवा त्यापेक्षा जास्त यातना त्यांच्या मुलाबाळांना आणि कुटूंबियांनी सहन करावं लागतात . आपल्या प्रियजनांना कारावासाची शिक्षा भोगावी लागत असल्याने समाजाकडून त्यांना मिळणारी अपमानास्पद वागणूक, वाळीत टाकणं यासांरख्या बाबीवर सुद्धा चित्रपटामध्ये अभ्यासपूर्वक प्रकाशझोत टाकण्याचा यशस्वी प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. सदरील कथा मुलीची आणि तिच्या कैदी वडिलांची हळव्या गोष्टीवर आधारित आहे. कैद्यांची उदाहरणं आपल्याला सिनेमांत विविध व्यक्तिरेखांच्या माध्यमातून पाहायाला मिळतात.
 
   
न पाहिलेलं वास्तव आणि कैद्याचं भावविश्व उलगडणारा ‘बाबांची शाळा’ हा सिनेमा नक्कीच एक वेगळा अनुभव देऊन जातो.
रेटिंग : 3.5/5