गुरूवार, 5 फेब्रुवारी 2026
  1. धर्म
  2. »
  3. धर्मयात्रा
  4. »
  5. धर्मयात्रा लेख
Written By वेबदुनिया|

सिद्धनाथ वीर गोगादेव

- शतायु

सिद्धनाथ वीर गोगादेव
‘‘पाबू, हडबू, रामदे, माँगलिया, मेहा। पाँचू पीर पधारज्यों, गोगाजी जेहा'' हा राजस्थानतील महान योगी पुरूषांच्या संदर्भात एक बहुचचर्चित दोहा. सिध्दनाथ वीर गोगादेव हे राजस्थानमधील पवित्र स्थान आहे. जगभरातील सर्व धर्मिय लोक येथे दर्शनाला येतात. यावरून वरील दोह्याची प्रचिती येते.

धर्मयात्रेच्या या भागात आम्ही आपल्याला घेऊन जात आहोत. राजस्थानातील दत्तखेड येथील सिध्दनाथ वीर गोगादेव यांच्या मंदिरात. नाथ संप्रदायातील हे महत्त्वाचे स्थान आहे.

WD
हिंदू, मुस्लिम, शीख धर्मातील लोकांच्या भक्तिसागरात न्हाऊन निघालेले मध्यकालीन महापुरुष गोगादेव हे एक धर्मनिरपेक्ष संत होते. गोगादेव यांचा जन्म राजस्थानच्या ददरेवा (चुरू) चौहान वंशात गुरु गोरखनाथाच्या कृपाशिर्वादाने भाद्रपद शुध्द नवमीला झाला होता. चौहान वंशात राजा पृथ्वीराज चौहान यांच्या पश्चात गोगादेव वीर हेच राजा पदाचे दावेदार होते. सतलजपासून तर हांसीपर्यंत (हरियाणा) गोगादेवजी यांचे प्रस्थ होते.

लोककथेत आलेला उल्लेख तसेच आख्यायिकेनुसार गोगादेवजींची नागदेवतेच्या रूपात पूजा केली जात असे. त्या काळातील लोक त्यांना गोगाजी चौहान, गुग्गा, जाहीर वीर व जाहीर पीर आदी नावानी ओळखत होते. गुरु गोरक्षनाथ यांचे प्रमुख शिष्य म्हणूनही त्यांची ख्याती होती. राजस्थानात असलेल्या सिद्ध पुरूषांमध्ये गोगाजी यांना महत्त्वाचे स्थान आहे.

WD
जयपूरपासून साधारण 250 किलोमीटवर असलेल्या सादलपूरच्या जवळच दत्तखेड येथे गोगादेवजींचा जन्म झाला. शेकडो वर्ष उलटल्यानंतर देखील आजही त्या जागी गोगादेवजी यांच्या घोड्याचा तबेला आहे. तसेच अजुनही घोड्याची रिकीब तेथे आहे. गुरु गोरक्षनाथाचा आश्रमही तेथे असून तेथे गोगादेव यांची घोड्यावर स्वार झालेली मूर्ती आहे. भाविक मोठ्या श्रध्देने येथे नवस फेडण्यासाठी येत असतात.

WD
जन्मस्थानापासून साधारण 80 किलोमीटवर असलेल्या हनुमानगढ़ जिल्ह्यात नोहर परिसरात गोगामढी येथे गोगादेव यांची समाधी आहे. येथे हिंदू, मुस्लिम धर्मातील पुजारी एकत्र येऊन पूजा करतात म्हणून त्याला सर्व धर्म समभावाचे प्रतीक समजले जाते. श्रावण शुध्द पोर्णिमा ते भाद्रपद शुध्द पोर्णिमा या दरम्यान गोगामढी येथील यात्रेत वीर गोगाजी यांची समाधी व गोरखटी येथे गुरु गोरक्षनाथाच्या यज्ञाचे मनोभावे दर्शन घेतात. ''गोगा पीर'' व ''जाहर वीर'' यांच्या जयघोषाने वीर गोगाजी व गुरु गोरक्षनाथाच्या मंदिराचा परिसर गर्जन जातो. भाविक मोठ्या भक्तिने गुरु गोरक्षनाथ यांच्या दरबारी जाऊन नतमस्तक होतात. त्यानंतर गोगोदेवजी यांचे दर्शन घेतात. परिसरात नांदत असलेल्या संस्कृतीत गोगाजी यांच्या प्रती अपार आदरभाव दिसून येतो.

कसे जाल?
हवाई मार्ग : गोगादेवजी यांच्या जन्मभूमीला जाण्यासाठी जयपूर हा जवळचा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.
रेल्वे मार्ग : जयपूरपासून 250 किलोमीटवरील सादलपूर येथे जाण्यासाठी रेल्वे गाड्या उपलब्ध आहेत.
महामार्ग : जयपूर देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गांनी जोडले आहे. जयपूर ते सादलपूर व सादलपूर येथून दत्तखेड येथे जाण्यासाठी बस अथवा टॅक्सी उपलब्ध असतात.