E20 इथेनॉल-मिश्रित इंधनावरून टीकाकारांना गडकरी यांचे खुले आव्हान
सध्या E20 इथेनॉल-मिश्रित इंधनावरून वाद सुरु आहे. विरोधक टीका करत आहे. वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टीकाकारांना खुले आव्हान दिले आहे. ते म्हणाले, E20 पेट्रोलमुळेएक जरी बाईक किंवा स्कूटरचे नुकसान झाले असेल तर नाव सांगा.
ई२० पेट्रोलवरून सुरू असलेला वाद अव्याहतपणे सुरू आहे. काहींच्या मते यामुळे गाडीचे मायलेज कमी होत आहे, तर काही जण इंजिनच्या टिकाऊपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. सोशल मीडियापासून ते रस्त्यांपर्यंत, ही चर्चा जोरात सुरू आहे. या वर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक निवेदन जारी केले आहे.
जेणे करून वादाला तोंड फुटले आहे. ते म्हणाले, जर E20 पेट्रोलमुळे एका जरी गाडीचे नुकसान झाले असेल, तर कृपया तिचे नाव सांगा. त्यांनी दावा केला की E20 च्या विरोधात पैसे देऊन खोटी मोहीम चालवली जात आहे.
नितीन गडकरी यांनी स्पष्टपणे सांगितले की, देशात E20 पेट्रोलमुळे गाडी बंद पडल्याची एकही घटना नोंदवली गेलेली नाही. अशा कोणत्याही घटनेची माहिती असल्यास कळवावी.
गडकरी म्हणाले की, भारत दरवर्षी अंदाजे 22 लाख कोटी रुपयांचे जीवाश्म इंधन आयात करतो. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा भार पडतो आणि प्रदूषणही वाढते. ते म्हणाले की, देशाला हरित इंधन आणि इतर पर्यायी इंधनांचा अवलंब करण्याची गरज आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी होईल आणि कार्बन उत्सर्जनही कमी होईल.
गडकरी म्हणाले की, देशात इथेनॉलच्या वाढलेल्या उत्पादनाचा शेतकऱ्यांनाही मोठा फायदा झाला आहे. त्यांनी पुढे सांगितले की, E20 ला प्रोत्साहन देण्याचा निर्णय वैयक्तिक फायद्यासाठी नव्हे, तर देश आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी घेण्यात आला आहे.
सरकार आता E20 च्या पलीकडे इथेनॉल-मिश्रित इंधनाचा वापर वाढवण्याची तयारी करत आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989मध्ये सुधारणा प्रस्तावित केल्या आहेत, ज्यामुळे E85, E100, B100 बायोडिझेल आणि हायड्रोजन-सीएनजी यांसारख्या पर्यायी इंधनांच्या वापराचा मार्ग मोकळा होईल.
Edited By - Priya Dixit