रविवार, 12 एप्रिल 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 मार्च 2026 (12:47 IST)

लाच घेताना पोलिस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात; राज्यात खळबळ

Police Inspector Caught in ACB Trap While Accepting Bribe; Creates Sensation Across the State
वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या टिप्परवर कारवाई न करण्यासाठी आणि 'मासिक हप्ता' म्हणून ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना मंठा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकासह एका कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ माजली आहे.
 
नेमकी घटना काय?
तक्रारदाराचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांचे टिप्पर पोलीस ठाण्यामार्फत पकडले जाऊ नयेत, यासाठी आरोपींनी दरमहा ५० हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी केली होती. या रकमेपैकी १० हजार रुपये यापूर्वीच स्वीकारण्यात आले होते. उर्वरित पैशांसाठी वारंवार तगादा लावल्याने तक्रारदाराने छत्रपती संभाजीनगर येथील 'एसीबी' (ACB) कडे धाव घेतली.
 
पोलीस निरीक्षकाची 'धक्कादायक' ऑफर: एसीबीने केलेल्या पडताळणी दरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला. पोलीस निरीक्षक मनोज कुमार राठोड यांनी तक्रारदाराला सांगितले की, "जर तू अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या इतर दोन गाड्या आम्हाला पकडून दिल्या, तर तुझ्या हप्त्यात मी सूट देईन." गुन्हेगारांना पकडण्याऐवजी स्वतःचा हप्ता वसूल करण्यासाठी पोलीस निरीक्षकाने दिलेली ही 'ऑफर' चर्चेचा विषय ठरली आहे.
 
अशी झाली कारवाई: गुरुवारी रात्री मंठा पोलीस ठाण्याच्या गोपनीय शाखेत सापळा रचण्यात आला. पोलीस अंमलदार रवी गणपत जाधव याने तक्रारदाराकडून तडजोडीअंती ठरलेली ३० हजार रुपयांची लाच स्वीकारली. पैसे स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने जाधव याला ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलीस निरीक्षक मनोज कुमार राठोड आणि अंमलदार रवी जाधव या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, त्यांच्या घरांचीही झडती घेतली जात आहे.
 
प्रमुख आरोपींचे नाव मनोज कुमार राठोड (पोलीस निरीक्षक, मंठा पोलीस ठाणे) आणि रवी गणपत जाधव (पोलीस अंमलदार) असे आहेत. ही धडक कारवाई छत्रपती संभाजीनगर एसीबीच्या पथकाने केली आहे.