परखड नाटककार विजय तेंडूलकर
| |
तेंडूलकरांनी वयाच्या सहाव्या वर्षी पहिली कथा लिहिली. त्यानंतर अकराव्या वर्षी पहिले नाटक लिहून अभिनयासह दिग्दर्शनाची भूमिकाही पार पाडली होती. १९२८ मध्ये जन्मलेल्या तेंडूलकरांचा नाटककार हा प्रवास प्रिंटीग प्रेसचा व्यवसाय, पत्रकारिता, जनसंपर्क अधिकारी असा झाला. आतापर्यंत त्यांनी २८ नाटके, सात एकांकिका, सहा बालनाट्य, चार कथासंग्रह, दोन कादंबर्या एवढी साहित्यसंपदा निर्णाण केली आहे. त्यांच्या घाशीराम कोतवाल या नाट्यकृतीने खूपच खळबळ माजवली.
पेशव्यांच्या काळात कोतवाल असणार्या घाशीरामने त्यावेळी खूप अत्याचार केले होते. बावनखणीत जाणार्या कोतवालाचे आयुष्य अगदी रगेल आणि रंगेल होते. तेच तेंडूलकरांनी या नाटकात मांडले होते. सांगितिक सादरीकरणाने नाटकही छान जमले होते. सुरवातीच्या वादानंतर मात्र हे नाटक धोधो म्हणजे सहा हजार प्रयोगांइतके चालले. आजही एखादा ग्रूप ते सादर करतो तेव्हा पहाण्यासाठी नक्कीच गर्दी होते. तेंडूलकरांचे आणखी गाजलेले व खळबळजनक नाटक म्हणजे सखाराम बाईंडर.
स्त्रियांना कचरा मानून त्यांचा येथेच्छ उपभोग घेणार्या सखारामच्या माध्यमातून तेंडूलकरांनी पुरूषी मानसिकेतेचेही विश्लेषण केले. या नाटकाला कुठेही काळाच्या मर्यादेत बांधता येणार नाही. कारण अशा प्रकारची मानसिकता ही कुठल्याही काळात असू शकते. पण एकूणच हे नाटक आल्यानंतर खूपच वादळ उठले. शिवसेनेने नाटकाविरोधात आंदोलन केले. सरकारनेही त्यावर बंदी घातली होती. नंतर ती उठवलीही. पण नाटकापुढची गर्दी ओसरली नाही. आता मराठीतील एक माईलस्टोन नाटक म्हणून ते ओळखले जाते.
गुजरातमध्ये मुस्लिमांच्या हत्येसाठी तेथील मुख्यमंत्री नरेंद्र मोदी जबाबदार असल्याने 'माझ्या हातात बंदूक असती तर मी नरेंद्र मोदींना मारले असते,' असे विधान करून त्यांनी खळबळ उडवून दिली होती.
अनेक भाषांमध्ये हे नाटक गेले आहे. त्याची शांतता कोर्ट चालू आहे, गिधाडे, कमला, कन्यादान ही अन्य काही नाटके. तेंडूलकरांनी लिहिलेल्या अनेक नाट्यकृती भारतीय नाट्य परंपरेतील ठेवा ठरल्या आहेत. तेंडूलकरांनी चित्रपटक्षेत्रातही ठसा उमटवला आहे. सामना, सिंहासन आक्रित, उंबरठा, निशांत, अर्धसत्य (हिंदी) या चित्रपटांच्या पटकथा तेंडूलकरांच्याच. हे सर्व चित्रपट गाजले. गिरीश कर्नाड, बादल सरकार आणि विजय तेंडूलकर या सर्वकालीन महान नाटककारानी आधुनिक भारतीय नाट्यपरंपरेचा पाया रचला आहे.
| |
तेंडूलकरांची मुलगी साहित्यिक व अभिनेत्री प्रिया तेंडूलकरचे कर्करोगाने निधन झाल्याने तेंडूलकर खचले होते. यातून ते पूर्णपणे सावरलेच नाही.
विजय तेंडूलकरांचे लेखन
नाटक : शांतता कोर्ट चालू आहे, सखाराम बाईंडर, कमला, कन्यादान, गिधाडे, मित्राची गोष्ट, द सायकलिस्ट, माझी बहिण, झाला अनंता हनुमंता, श्रीमंत, मी जिंकलो मी हरलो
चित्रपट पटकथा : निशांत, सामना, मंथन, सिंहासन, गहराई, अंकीत, आक्रोश, उंबरठा, अर्धसत्य.
