शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : गुरूवार, 11 नोव्हेंबर 2021 (17:09 IST)

उद्धव ठाकरे : स्पाँडिलायटिस शस्त्रक्रिया किती गंभीर आजार आहे?

- ओंकार करंबेळकर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मानेजवळील स्नायू दुखावल्याची बातमी माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी (10 नोव्हेंबर) हॉस्पिटलमध्ये दाखल झाले असून दोन ते तीन दिवस उपचार घेणार आहेत.
 
उद्धव ठाकरे यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे,"दोन वर्षांपासून आपण कोव्हिडचा मुकाबला करतो आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असतांना दुसरीकडं आपलं जीवनचक्र सुरू राहावं, राज्यातली विकास कामं सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्यानं प्रयत्न करतोय.
 
"मान देखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हणलं तरी थोडंसं दुर्लक्ष झालं आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच!"
 
उद्धव ठाकरेंना स्पाँडिलायटिस असल्याचं माध्यमांनी सांगितलं आहे.
 
मानदुखी, पाठदुखी यासारखे त्रास होत असल्यास साधारणपणे स्पाँडिलॉसिस, स्पॉंडिलायटिस असे शब्द कानावर येतात. मात्र प्रत्येक मानदुखी, पाठदुखीसाठी हे शब्द लागू होतीलच असे नाहीत. या दोन्ही शारीरिक अवस्थांबद्दल आपण माहिती घेऊ.
 
या दोन्हींमध्ये काही गोष्टी समान आहेत आणि काही गोष्टी वेगवेगळ्या आहेत.
 
त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ती म्हणजे, आपली मान, मणका, पाठ यासंदर्भात कोणतीही तक्रार असेल तर त्याचं निदान रुग्णाने स्वतःच करू नये. तसेच स्वतःच कोणत्याही हालचाली, औषधोपचार करू नयेत. त्यासाठी डॉक्टरांची मदत घ्यावी.
 
तुम्हाला नक्की काय झाले आहे, किती तीव्रतेचा आजार आहे हे डॉक्टरच तपासणीनंतर सांगू शकतात. तसेच शस्त्रक्रिया, औषधोपचार, व्यायाम, फिजिओथेरपी यांबद्दल निर्णयही डॉक्टरच घेऊ शकतात.
 
स्पाँडिलॉसिस-
वाढत्या वयानुसार आपल्या शरीरातील स्नायू आणि हाडांची झीज होत असते. त्याला सर्वायकल स्पाँडिलॉसिस असं म्हणतात. यातील सर्वायकल या शब्दाचा अर्थ 'मानेसंबंधी' असा आहे.
 
मणक्यातील चकत्यांची झिज झाल्यामुळे वेदना होतात, या स्थितीला स्पाँडिलॉसिस असं म्हणतात. काही ठिकाणी याचा उच्चार स्पाँडिलिसिस असाही केल्याचं दिसून येतं.
 
सर्वायकल स्पाँडिलॉसिसची लक्षणं
युनायटेड किंग्डमच्या एनएचएस या आरोग्यसंस्थेने स्पाँडिलॉसिसची काही लक्षणं सांगितली आहेत. त्यानुसार काही लक्षणांची माहिती घेऊ
 
मान आणि खांदे दुखणं, तिथं आखडल्यासारखं वाटणं. ही स्थिती सतत येणं आणि जाणं.
मानेजवळ डोकं दुखायला सुरू होणं.
सतत वेदना होणं.
शर्टाचं बटण लावण्यासारख्या क्रिया करताना त्रास होणं.
पाय किंवा हात जड झाल्यासारखे किंवा अशक्त होणं.
टोचल्यासारखं वाटणं, मुंग्या येणं किंवा त्वचा बधीर झाल्यासारखी होणं.
चालताना त्रास होणं.
लघवी, शौच यावरचा ताबा जाणं.
एनएचएसच्या मते, या लक्षणांना ओळखून योग्य उपचार न केल्यास मणक्यावर कायमचे दुष्परिणाम होऊ शकतात.
 
सर्वायकल स्पाँडिलॉसिसची कारणं
साधारणपणे पन्नाशी उलटलेल्या लोकांमध्ये वयोमानामुळे सर्वायकल स्पाँडिलासिस दिसून येतो.
 
तुमचं काम मानेच्या सततच्या हालचालींशी संबंधित असल्यास किंवा डोक्यावरचं रंगकाम, सजावटीसारखं काम असल्यास हा त्रास होऊ शकतो.
यापूर्वी तुम्हाला मानेला दुखापत झालेली असल्यास
अशाप्रकारच्या दुखण्याचा कौटुंबिक इतिहास असेल तर
स्पाँडिलायटिस
याला अँकिलुजिंग स्पाँडिलायटिस असं म्हणतात. मणका आणि शरीरातील इतर भागांमध्ये होणाऱ्या दाहामुळे (Inflammation) ही स्थिती निर्माण होते. हा त्रास तरुणांमध्येही दिसून येतो. स्पाँडिल (Spondyl) या शब्दाचा अर्थ मणक्याची हाडं किंवा मणका असा होतो. इटिस (itis) म्हणजे दाह, जळजळ.
 
स्पाँडिलायटिसची लक्षणं
स्पाँडिलायटिसची लक्षणं व्यक्तीपरत्वे बदलू शकतात. यातील मुख्य लक्षणं पुढीलप्रमाणे असू शकतात.
मानदुखी आणि मान आखडल्यासारखी होणे
शरीराच्या इतर अवयवांमध्ये दाह-जळजळीमुळे वेदना, सूज येणे. स्नायूबंध आणि सांधे जिथं जोडले जातात तिथं दाह निर्माण होऊन दुखणं.
एनएचएसच्या माहितीनुसार ही लक्षणं हळूहळू वाढत जातात. याला काही महिन्यांपासून वर्षांचा कालावधी लागू शकतो. ती लक्षणं येऊन पुन्हा जाऊही शकतात. काही लोकांमध्ये ती काळानुसार कमी होतात, तर काही लोकांमध्ये ती वाढत जातात.
 
ही लक्षणं गंभीर होत गेली तर त्याचे दुष्परिणामही गंभीर होऊ शकतात. स्पाँडिलायटिस मोठ्या प्रमाणात वाढल्यास हाडं कमकुवत होऊ शकतात, मणक्याला फ्रॅक्चर होऊ शकते. हृदय-रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार होऊ शकतात. छातीत संसर्ग होऊ शकतो. दुर्मिळ स्थितीत मूत्रपिंडाचे आजार होऊ शकतात असं एनएचएस सांगतं.
 
मान आणि पाठीच्या आजारांवर फिजिओथेरपीचा उपचार सुचवला जातो. कोल्हापूर येथे कार्यरत असणारे डॉ. तेजस खानोलकर यांच्याशी बीबीसी मराठीने संवाद साधला.
 
फिजिओथेरपीबद्दल बोलताना डॉ. खानोलकर म्हणाले, "स्पाँडिलॉसिसमध्ये फिजिओथेरपीचा किती उपयोग करायचा हे रुग्णाच्या स्थितीवर ठरतं. त्याची पूर्ण तपासणी करुन निदान करुनच डॉक्टर याचा निर्णय घेऊ शकतात. सुरुवातीच्या टप्प्यात फिजिओथेरपीद्वारे रुग्णाच्या वेदना कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यानंतर हळूहळू सुधारणा होण्यासाठी प्रयत्न केले जातात."
 
स्पाँडिलायटिसबाबत बोलताना डॉ. खानोलकर म्हणाले, "यामध्ये औषधोपचारांसह फिजिओथेरपीची मदत घेतल्यास रुग्णाचा त्रास कमी होऊ शकतो. स्पाँडिलायटिसच्या रुग्णाला भविष्यात त्रास कमी व्हावा यासाठी या उपचारांची मदत होऊ शकते."