शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 11 नोव्हेंबर 2021 (10:10 IST)

द्वारकेतून 17 किलो ड्रग्ज जप्त, गुजरातचा समुद्रकिनारा तस्करीचा मार्ग बनत आहे का?

कच्छमधील मुंद्रा बंदरावरून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केल्यानंतर आता देवभूमी द्वारका जिल्ह्यातील वाडीनार येथून 17 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. स्थानिक पोलिसांनी याबाबत माहिती दिली असून गुजरातमध्ये ड्रग्जची जप्ती सुरू आहे.
वाडीनार येथून अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून एका व्यक्तीलाही अटक करण्यात आली असल्याचं देवभूमी द्वारका जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सुनील जोशी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
राज्यात अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय टोळी कार्यरत आहे का? यावर उत्तर देताना एस पी जोशी म्हणाले, की 88 कोटी रुपयांच्या ड्रग्ज मागे कोण आहे हे आताच स्पष्ट सांगता येणार नाही. तपासाअंती संपूर्ण प्रकरण समोर येईल.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. परंतु अनेक स्थानिक माध्यमांनी दिलेल्या रिपोर्टमध्ये 60 किलोहून अधिक ड्रग्ज ताब्यात घेण्यात आल्याचा उल्लेख आहे. याआधी कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा बंदरातून मस्मोटो ड्रग्ज ताब्यात घेण्यात आली होती. याची दखल केवळ राष्ट्रीय पातळीवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली.
महसूल गुप्तचर विभागाने (DRI) मुंद्रा बंदरातून दोन स्वतंत्र कंटनेरमधून 3 हजार किलो हेरॉईन जप्त केले. त्याचं बाजारमूल्य 15 हजार कोटी रुपये होते.
स्थानिक रिपोर्ट्सनुसार, देवभूमी द्वारका येथून अंमली पदार्थ जप्त करण्यासाठी स्थानिक पोलिसांच्या विविध शाखांनी संयुक्त कारवाई केली. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा आणि विशेष ऑपरेशन ग्रुपचा सहभाग होता.
समुद्रमार्गे अंमली पदार्थांची तस्करी करण्याचा प्रयत्न
विविध स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, देवभूमी द्वारका पोलिसांनी खंभलिया महामार्गावरील आराधना धाममधून ड्रग जप्त केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ड्रग्ज समुद्रमार्गे गुजरातमध्ये आणण्यात आले. मुंद्रा येथून जप्त केलेले हजारो किलो हेरॉइनही समुद्रामार्गे राज्यात आणण्यात आले होते.
मुंद्रा येथून जप्त करण्यात आलेल्या हेरॉइनच्या कंटेनरमध्ये अफगाण टाल्क असल्याचे सांगण्यात आले होते, जे इराणच्या अब्बास बंदरातून गुजरातमधील मुंद्रा बंदरात पाठवण्यात आले होते. यापूर्वी भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने समुद्रात संयुक्त कारवाई करत 250 कोटी रुपयांचे हेरॉइन जप्त केले होते.
 
गेल्या काही वर्षांत गुजरातमध्ये समुद्रमार्गाने वेगवेगळ्या कार्यपद्धतीच्या मदतीने अंमली पदार्थांची तस्करी करण्यात आली आहे. उत्तर भारतातही जमीनमार्गाने ड्रग तस्करी करण्यात आली. एवढंच नव्हे तर पाश्चिमात्य देशातही त्याचा पुरवठा करण्यात आला आहे.
21 सप्टेंबर 2021 रोजी मुंद्रा इथून हेरॉइन जप्त झाल्यानंतर बंदराचे चालक अदानी पोर्ट आणि सेझ यांनी इराण, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून कंटेनर आणि माल हाताळण्यावर बंदी घातली.
गुजरात ट्रांझिट मार्ग
पूर्वी सोनं-चांदी, घड्याळं किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंची तस्करी करण्यासाठी गुजरातचा समुद्रमार्ग चर्चेत होता. 1993च्या बॉम्ब स्फोटांदरम्यानही याची चर्चा झाली होती. त्यावेळी पोरबंदर येथे आरडीएक्स आणि शस्त्रं उतरविण्यात आली होती. यापूर्वी गुजरातमधील सल्या, ओखा आणि मांडवी सारख्या सौराष्ट्र बंदरांवर सोनं, घड्याळं किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंची तस्करी केली जात असे.
1993 मध्ये आरडीएक्स आणि शस्त्रास्त्रांचा माल पोरबंदर येथील गोसाबारा बंदरावर उतरला, ज्याचा वापर त्यावेळी मुंबईत बॉम्ब स्फोट करण्यासाठी केला गेला. गुजरात गेल्याकाही वर्षांपासून ट्रांझिट मार्ग म्हणून वापरण्यात येत आहे.
यापूर्वी कच्छ, पंजाब आणि राजस्थानच्या सीमेवरील खाणी किंवा पाईपद्वारे देशात अंमली पदार्थांची तस्करी केली जात होती. अलीकडच्या काही वर्षांत गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यांद्वारे भारतात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची तस्करी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
 
2018 मध्ये 500 किलो हेरॉइन समुद्रमार्गे भारतात पाठवण्यात आल्याचे उघड झाले होते. हे ड्रग्ज कारने कच्छहून उंझा येथे पाठवण्यात आले त्यानंतर जिऱ्याने भरलेल्या ट्रकमध्ये लाकडी फ्रेमखाली लपवून हे ड्रग्ज पंजाबला पाठवण्यात आले.
मूळचे कच्छ येथील हे छोटे जहाज भूमध्य समुद्रातील पाकिस्तानी जहाजातून ड्रग्ज घेऊन भारतात तस्करी करत असल्याचा आरोप आहे.
एप्रिल 2021 मध्ये आणखी एक माल जप्त करण्यात आला आणि तो पंजाबला पाठवला जाणार होता. अखेर हे प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवण्यात आलं.
गुजरातला 1600 किमीचा समुद्रकिनारा आहे. गुजरातमध्ये 30 हजारहून अधिक नोंदणीकृत बोटी आणि छोटी जहाज आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुद्रात त्यांच्या कारवायांवर लक्ष ठेवणे कठीण आहे. ड्रग्ज जप्तीची कारवाई केलेले एटीएसचे अतिरिक्त पोलीस आयुक्त भावेश रोजिया यांच्या मते, "अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणात अफू तयार होते, ज्यातून भारतात हेरॉइनची तस्करी करण्याचे प्रयत्न केले जातात."
"गुजरात आणि पंजाबदरम्यानची सीमा सील करण्यात आली आहे. याशिवाय एलओसीच्या माध्यमातून व्यापारही थांबवण्यात आला आहे. म्हणूनच अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी इतर मार्गांकडे लक्ष दिले जात आहे. त्यामुळे हे टिकणे कठीण आहे,"
"हे ड्रग्ज यशस्वीरित्या भारतात आणली गेली तर ती वेगवेगळ्या ठिकाणी पाठवली जातात आणि नंतर आखाती किंवा पाश्चिमात्य देशांना एक किंवा दोन किलो ग्रॅम अशा कमी प्रमाणात पाठवतात," असं यापूर्वी तपासाअंती समोर आलं होतं.
सुरक्षा एजन्सी, नौदल, तटरक्षक यांच्यासह मासेमारी समुदायातील माहिती देणाऱ्यांचे जाळे समुद्रात सामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या रेडिओवर लक्ष ठेवले जाते आणि केंद्रीय गुप्तचर एजन्सीच्या गुप्तचर यंत्रणेच्या आधारे, भारतात येणारा प्रवाह रोखण्याचा प्रयत्न केला जातो.
अफगाणिस्तान, तालिबान आणि ड्रग्ज
अलीकडच्या काळात गुजरातमध्ये जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जचे मूळ पाकिस्तान, अफगाणिस्तान किंवा इराणमध्ये असल्याचा दावा सुरक्षा यंत्रणांनी केला आहे. डीआरआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या नागरिकांची नावंही तपासादरम्यान समोर आली असून त्यांची चौकशी सुरू आहे.
अफगाणिस्तानात झालेल्या उठावामुळे अंमली पदार्थांच्या तस्करीत वाढ झाली आहे की नाही यादृष्टीनेही तपास केला जात आहे.
तालिबानच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत म्हणजे अफूच्या शेतकऱ्यांकडून खंडणी आणि तस्करांकडून मनी लाँडरिंग. जगातील अफूच्या उत्पादनात अफगाणिस्तानचा वाटा 80 टक्के आहे, असं युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्स अँड क्राइमने म्हटलं आहे.