शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 11 नोव्हेंबर 2021 (13:00 IST)

नवाब मलिकांच्या जावयाने पाठवली फडणवीसांना नोटीस, बिनशर्त माफीची मागणी

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस पाठवली असून बिनशर्त माफीची मागणी केली आहे.
 
नवाब मलिकांचे जावई (समीर खान) हे ड्रग्ससोबत सापडले असं विधान केल्याबद्दल समीर खान यांनी फडणवीसांना नोटीस पाठवली आहे. जर या नोटीसला उत्तर दिले नाही तर कायदेशीर कारवाईचा इशारा करण्यात येईल आणि अब्रुनुकसानीचा दावा करण्यात येईल असे त्यांनी म्हटले आहे.
 
झालेल्या त्रासाबद्दल 5 कोटी रुपये नुकसान भरपाई आणि बिनशर्त माफी मागावी असे त्यांनी या नोटीसमध्ये म्हटले आहे.
 
नवाब मलिक यांची मुलगी निलोफर मलिक खान यांनी ही नोटीस ट्वीट केली आहे.
 
आशिष शेलार काय म्हणाले?
10 तारखेला नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यात त्यांनी फडणवीसांचे मुन्ना यादव, रियाज भाटी यांच्याशी संबंध आहे असं म्हटलं होतं.
 
त्यांच्या आरोपांना उत्तर देताना भाजप नेते आशिष शेलार यांनी मलिकांवरच पुन्हा आरोप केले.
 
"आता विरोधी पक्षातील हाजी अराफत, हाजी हैदर या नव्या नेतृत्वाला बदनाम करण्याचं काम सुरू आहे. अल्पसंख्याक समाजातील एक एक नाव वेचून त्यांची बदनामी करून त्यांना नेस्तनाबूत करावं, असा प्रकार नवाब मलिक यांच्याकडून सुरू आहे," असा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे.
 
10 नोव्हेंबर रोजी झालेल्या आयोजित पत्रकार परिषदेत आशिष शेलार बोलत होते.
 
आजच सकाळी अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते.
हे आरोप फेटाळून लावताना शेलार यांनी मलिक यांच्यावरच अनेक प्रत्यारोप केल्याचं दिसून आलं.
 
हायड्रोजन बाँबची भाषा करणारे सकाळी 10 वाजता लवंगीसुद्धा लावू शकले नाही. लवंगी लावायच्या प्रयत्नात त्यांनी स्वतःचे हात पोळून घेतले.
 
मलिक यांची हतबलता, घालमेल इतकी होती की हायड्रोजन सोडा, त्यांनाच आता ऑक्सिजनची गरज लागेल की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
 
मुन्ना यादव, हाजी हैदर, हाजी अराफतचा भाऊ, रियाज भाटी, समीर वानखेडे, इंटरनॅशलन कॉल, खंडणी अशी नावे आणून त्यांनी खूप मोठं चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रयत्न विफळ ठरला.
 
याचं कारण म्हणजे या सगळ्याचा संबंध देवेंद्र फडणवीस यांच्याशी जोडण्यात काहीच तथ्य नाही.
 
संपूर्ण राज्य सरकारची यंत्रणा तीन पक्ष एकत्र लावूनसुद्धा देवेंद्र फडणवीसांवर लागू होणारा आरोपही ते करू शकले नाहीत.
 
मुन्ना यादव, हाजी अराफत, हाजी हैदर हे तिघेही पक्षाचे कार्यकर्ते आहेत. यापैकी हाजी अराफत, हाजी हैदर यांच्यावर एकही गुन्हा नाही. त्यांची चौकशी केल्यानंतरच त्यांची पदावर नियुक्ती करण्यात आली होती.
 
मुन्ना यादव यांच्यावर एक आरोप आहे. त्याचं स्पष्टीकरण स्वतः मुन्ना यादव देतील. त्याच्याशी राष्ट्रवादी काँग्रेसचंही एक कनेक्शन आहे. त्याची माहिती मुन्ना यादव तुम्हाला काही वेळात देतील.
 
गेली दोन वर्षे तुमचं सरकार आहे. तुमच्या पक्षातल्या नेत्याकडेच गृहमंत्रिपद आहे. आज तुम्ही आरोप करत असलेल्या हाजी अराफत, हाजी हैदर यांच्यावर एखादा अदखलपात्र गुन्हाही तुम्ही दाखल करू शकला नाहीत.
 
खरं तर गुन्हेगारांना राजाश्रय हा धंदा तुमचा. त्यांच्या आरोपांपैकी एकही काम देवेंद्र फडणवीस यांच्या काळात झालं नाही.
 
14 कोटी बनावट नोटांच्या प्रकरणात पकडला गेलेला हाजी अराफत यांचा भाऊ इम्रान आलम शेख हा काँग्रेसचा तत्कालीन सचिव होता. सध्या तो राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे.
 
यासंदर्भात हाजी अराफत हे स्वतःसुद्धा पत्रकार परिषद घेणार आहेत. सामान्य माणसांना अडकवण्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचा काम सुरू आहे.
 
त्यांनी रियाज भाटी यांचा उल्लेख केला. पंतप्रधान कार्यालयाशी त्यांचा काहीएक संबंध नाही. फोटोवरून संबंध प्रस्थापित करायचे असतील तर त्याचे इतरही फोटो पाहा.
 
देवेंद्र फडणवीस यांचा रियाज भाटीशी संपर्क संबंध असण्याचं कारणही नाही. त्याला क्रिकेटच्या राजकारणात राजाश्रय कुणी दिलं, हे जगजाहीर आहे. कुठल्याही मोठ्या नेत्याचं नाव घेऊन खळबळ माजवणं ही आमची प्रथा नाही.
 
रियाज भाटी हा गायब आहे की त्याला पळवण्यात आलं आहे? हे काम राष्ट्रवादी काँग्रेसने तर केलं नाही ना?
 
कारण वाजेच्या प्रकरणात रियाज भाटीचं नावही समोर आलं आहे. त्यामुळे सत्य बाहेर येईल म्हणून त्याला राष्ट्रवादी काँग्रेसनेच पळवलं नाही ना?
 
आज काल आणि आधीही जी नावे समोर आणली जात आहेत, ते बघितलं तर एका प्रश्नाचं उत्तर नवाब मलिक यांना द्यावं लागेल.
 
राज्यातील अल्पसंख्याक समाजातील नेतृत्व, कार्यकर्ते यांना नेस्तनाबूत करण्याचं काम तर नवाब मलिक करत नाहीत ना?
 
एक एक नाव वेचून त्यांची बदनामी करून त्यांना नेस्तनाबूत करावं, असा प्रकार सुरू आहे.
 
आर्यन खान तुमच्यामुळेच अडचणीत आला. आता शाहरूख खान अडचणीत येत आहे. काल परवा त्यांनी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांचं नाव यात ओढलं. आता विरोधी पक्षातील हाजी अराफत, हाजी हैदर या नव्या नेतृत्वाला बदनाम करण्याचं काम सुरू आहे. दोन SIT नंतर आणखी एका अल्पसंख्याक नेत्याचं नाव पुढे आणण्यासाठी नवाब मलिक यांचा प्रयत्न सुरू आहे. हा शुद्ध कट आहे, अल्पसंख्याक समाजाने याची दखल घ्यावी असं आशिष शेलार म्हणाले.
 
नवाब मलिक काय म्हणाले?
महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. नोटाबंदीच्या काळात फडणवीसांनी बनावट नोटांची प्रकरणं दाबली असं मलिक यांनी म्हटलं आहे.
 
8 नोव्हेंबर 2016 ला नोटबंदी झाली तेव्हा संपूर्ण देशात 2000, 500 च्या नकली नोटा सापडत होत्या. मध्य प्रदेश, तामिळनाडूमध्ये नकली नोटा सापडत होत्या.
 
पण महाराष्ट्रात अशी प्रकरणे सापडत नव्हती, कारण नकली नोटांचं रॅकेट चालवणाऱ्या लोकांना तत्कालीन सरकारचं संरक्षण होतं, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
 
8 नोव्हेंबर 2016 ला नोटबंदी झाली. त्यानंतर जवळपास वर्षभर म्हणजेच 8 ऑक्टोबर 2017 पर्यंत महाराष्ट्रात नकली नोटांचा प्रकार समोर आला नाही. कारण फडणवीस यांच्या देखरेखीखालीच नकली नोटांचा कारभार महाराष्ट्रात सुरू होता, असं मलिक म्हणाले.
 
8 ऑक्टोबर 2017 ला बीकेसीला छापेमारी झाली तेव्हा 14 कोटी 56 लाख रुपये जप्त करण्यात आले.
 
तेव्हाही फडणवीस यांनी त्यावर पांघरूण घालायचं काम केलं.
 
अटक झाली तरी जामीन मिळून ते बाहेर आले. प्रकरण NIA कडे देण्यात आलं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणाचं गुन्हेगारीकरण केलं.
 
मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या गुन्हेगार लोकांना राजकीय पदांवर बसवलं, असं मलिक म्हणाले.
 
आज (10 नोव्हेंबर) आयोजित पत्रकार परिषदेत नवाब मलिक म्हणाले, "देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर काही आरोप केले होते. त्याबाबत अधिक माहिती मी आज देईन, असा खुलासा मी कालच केला होता.
 
मी मंत्री असताना सलीम पटेल यांच्याबाबत मला माहिती होती का, असं फडणवीस यांनी विचारलं होतं. पण 2005 मध्ये मी मंत्रिपदावर नव्हतो, हे मी सांगू इच्छितो."
 
आर. आर. पाटील यांच्यासोबत त्याचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. आम्ही मुनीरा यांच्याकडून संपत्ती विकत घेतल्यानंतर हा व्हीडिओ व्हायरल झाला होता.
 
त्यावेळी दाऊद इब्राहिमशी संबंध जोडणाऱ्या प्रत्येकाविरुद्ध सलीम पटेल यांनी अब्रूनुकसानीचा दावा केला होता.
 
सलीम पटेल हे मुनीरा यांचे पॉवर ऑफ अॅटोर्नी होते. त्यांचं निधन झाल्याची माहिती मला पाच महिन्यांपूर्वी मिळाली.
 
सरदार वली खान या गुन्हेगारासोबत तुम्ही व्यवहार केला, असा माझ्यावर आरोप करण्यात आला. पण 2005 ला तो दोषी सिद्ध झाला नव्हता.
 
सध्या NCB मार्फत निर्दोष लोकांना अडकवण्याचं, हजारो कोटी उकळण्याचं काम सुरू आहे. त्याच्याविरोधात मी लढाई लढत आहे. पण या लढाईला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करत आहेत.
 
इतकंच नव्हे तर यामधून समीर वानखेडे यांना वाचवण्याचाच प्रयत्न देवेंद्र फडणवीस करत आहेत. कारण वानखेडे यांच्याशी फडणवीसांचे जुने संबंध आहेत.
 
2008 मध्ये एखादा अधिकारी मुंबईत येतो, 14 वर्षांपासून मुंबई सोडतच नाही, यामागे काय गूढ आहे?
 
अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा देवेंद्रजी दुसऱ्यांना म्हणतात. पण सगळे अंडरवर्ल्डशी संबंधित असलेले, गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक तुम्ही मुख्यमंत्री असताना सरकारी पदांवर कसे होते?
 
नागपूरचा कुख्यात गुंड मुन्ना यादव. ज्याच्यावर खूनापासून सगळे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो तुमचं राजकीय भय पसरवण्यासाठीचा साथीदार आहे. त्या मुन्ना यादवला तुम्ही बांधकाम कामगार मंडळाचा अध्यक्ष बनवलं होतं की नाही? तुमच्या गंगेत आंघोळ करून तो पवित्र झाला होता का?
 
हैदर आझम नामक एका नेत्याला तुम्ही मौलाना आझाद फायनान्स कॉर्पोरेशनचं अध्यक्ष बनवलं होतं की नाही?
 
हैदर आझम बांग्लादेशी लोकांना मुंबईत वसवण्याचं काम करत नाही का? त्याची मूळची बांग्लादेशी असलेली दुसरी पत्नी, जिचा मालाड पोलीस ठाण्याकडून तपास करण्यात येत होता, तिची कागदपत्रे बनावट असल्याचं 24 परगणा पोलिसांनी सांगितलं. तेव्हा तिच्यावर गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असताना तुम्ही मुख्यमंत्री कार्यालयातून फोन करून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला नाही का?
तुमच्या इशाऱ्यावरून संपूर्ण महाराष्ट्रात खंडणीखोरीचं काम होत होतं की नाही?
 
मुंबईची प्रकरणे असो की बिल्डरांच्या जमिनीचे वाद, प्रकरण पोलीस ठाण्यात दाखल करून वसुली केली जात होती की नाही?
 
जमीन मालकांना पकडून आणून त्यांची जमीन आपल्या नावे लिहून घेण्यात येत होती की नाही?
 
तुमच्या काळात परदेशातून लोकांना फोन येत होते, पोलीस ते सेटल करत होते की नाही?
 
पण सगळ्यात गंभीर आरोप मी आता लावत आहे.
 
2016 ला पंतप्रधान मोदींनी आतंकवाद, काळा धन, बनावट नोटा नष्ट करण्यासाठी नोटबंदी करत असल्याचं सांगितलं.
 
देशात सगळीकडे बनावट नोटा सापडल्या. पण 8 ऑक्टोबर 2017 पर्यंत महाराष्ट्रात बनावट नोटांचं प्रकरण आढळलं नाही. कारण देवेंद्र फडणवीस यांच्याच देखरेखीखाली बनावट नोटांचं रॅकेट महाराष्ट्रात सुरू होतं.
 
8 ऑक्टोबर 2017 ला इंटेलिजन्स डायरेक्टर रेव्हेन्यूने बीकेसीमध्ये एक छापा टाकला.
 
त्यामध्ये 14 कोटी 56 लाख रुपयांच्या बनावट नोटा पकडण्यात आल्या. पण ते प्रकरण मिटवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मदत करण्याचं काम केलं.
 
बनावट नोटांचं नेक्सस पाकिस्तानकडून बांग्लादेशमार्फत संपूर्ण देशात पसरवलं जातं.
 
8 ऑक्टोबरच्या छाप्यानंतर मुंबईत इम्रान आलम शेख, पुण्यात रियाज शेख आणि नवी मुंबईत एक अशी तीन जणांना अटक झाली होती.
 
पण 14 कोटी 56 लाखांच्या जप्तीचं 8 लाख 80 हजार म्हणून प्रकरण दाबण्यात आलं.
 
पाकिस्तानच्या बनावट नोटा भारतात आल्या, गुन्हा दाखल होतो. या प्रकरणात काही दिवसांत जामीन मिळतो. प्रकरण NIA ला दिलं जात नाही. याचा तपास योग्य दिशेने होत नाही. कारण हे बनावट नोटांचं रॅकेट चालवणाऱ्या लोकांना तत्कालीन सरकारचं संरक्षण होतं.
 
तो काँग्रेसचा नेता असल्याचं रचण्यात आलं. तो कधीच काँग्रेसचा नेता नव्हता. पण पकडला गेल्यास काँग्रेसच्या नावाने बिल फाडायचं, असा डाव रचण्यात आला.
 
यात अटक करण्यात आलेला इम्रान आलम शेख हा हाजी अरफात शेखचा लहान भाऊ आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अरफात शेख यांना अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष बनवलं होतं, असं मलिक यांनी म्हटलं.
 
देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप
तत्पूर्वी, काल (9 नोव्हेंबर) देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते.
 
नवाब मलिकांनी कोट्यवधी रुपयांची जमीन केवळ 30 लाख रुपयांना विकत घेतली, असं फडणवीस यांनी म्हटलं.
 
1993 बॉम्बस्फोटातील दोषी असलेला सरदार शाह वली खान या व्यक्तीकडून एका कंपनीच्या मार्फत नवाब मलिकांनी एलबीएस रोडवर जागा विकत घेतली आहे.
 
आर. आर. पाटील हे एकदा एका इफ्तार पार्टीला गेले होते. त्या पार्टीत उपस्थित असलेल्या मोहम्मद सलीम पटेल या व्यक्तीसोबत त्यांचा फोटो झळकला होता. सलीम पटेल हा दाऊदचा माणूस होता. यात आर. आर. पाटील यांचा काही दोष नव्हता पण याच सलीम पटेलकडून नवाब मलिकांनी जमीन विकत घेतली असं देवेंद्र फडवणीस यांनी म्हटले आहे.
 
सलीम पटेल हा हसीना पारकर यांचा ड्रायव्हर होता. त्याच्या नावावरच पॉवर ऑफ अॅटर्नी देण्यात आलेली होती.
 
1 लाख 23 हजार स्क्वेअर फूटांची गोवावाला कंपाऊंड येथे एलबीएस मार्गावर मोक्याच्या ठिकाणी ही जमीन आहे. या जमिनीची एक नोंदणी सॉलिडस नावाच्या कंपनीच्या नावावर आहे. ही कोट्यवधी रुपये किंमत असलेली जमीन केवळ 30 लाख रुपयांना विकण्यात आली. हा व्यवहार खरा झाला की केवळ अंडरवर्ल्डची जमीन सरकारकडे जाऊ नये म्हणून हा व्यवहार करण्यात आला होता, याचा तपास होणे आवश्यक आहे, असं फडणवीस यांनी म्हटले.